छोटे कपडे घालून गुलजार यांना भेटायला गेल्यामुळे ट्रोल झालेल्या नीना गुप्तांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:18 AM2021-08-08T10:18:57+5:302021-08-08T10:22:47+5:30
नीना गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गुलजार यांच्या भेटीचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि या व्हिडीओमुळे नीना ट्रोल झाल्या होत्या. त्यांच्या कपड्यांवरून युजर्सनी नको त्या कमेंट्स केल्या होत्या.
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) म्हणजे आपल्या अटींवर आयुष्य जगणारी महिला. अलीकडे नीना यांचे ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आणि नीना चर्चेत आल्या. काही दिवसांपूर्वी नीना गुप्ता यांनी गुलजार (Gulzar)यांची भेट घेत त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. या भेटीचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि या व्हिडीओमुळे नीना ट्रोल झाल्या होत्या. होय, त्यांच्या कपड्यांवरून युजर्सनी नको त्या कमेंट्स केल्या होत्या. आता या ट्रोलिंगला नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे.
‘डायल 100’ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नीना यावर बोलल्या.
गुलजार यांना भेटायला जाताना मी शॉर्ट्स व शर्ट घालून गेले म्हणून लोकांनी मला ट्रोल केलं. मी साडी नेसून त्यांना भेटायला जायला हवं होतं, असा सल्ला मला अनेकांनी दिला. पण मला याची पर्वा नाही. आज नाही तर 30 वर्षांपासून मी गुलजार यांना अशीच भेटत आलीये. मसाबाचा जन्म व्हायला होता, तेव्हापासून आमची मैत्री आहे.
माझी पहिली टेनिस रॅकेटही मला गुलजार साहेबांनीच दिली होती. ते रोज अंधेरीत टेनिस खेळायला जायचे आणि माझे घर जुहूत होते. मला पण शिकायचं आहे, असे मी त्यांना म्हणाले होते. यानंतर ते रोज सकाळी 6 वाजता मला घ्यायला याचचे. तेव्हाही मी शॉर्ट्स व शर्टमध्येच असायचे. तेव्हा मला ट्रोल करणा-या मूर्खांना सांगा की, आम्ही तेव्हापासून शॉर्ट्समध्येच एकमेकांना भेटायचो. गप्पा करायचो. धम्माल करायचो. त्यामुळे ज्यांना जे बोलायचं ते बोलू देत. ते त्यासाठी स्वतंत्र आहेत. अगदी तसंच मला जे करायचं ते मला करू द्या. मी त्यासाठी स्वतंत्र आहे. मला माझे ज्ञान पाजळायचं नाही. फक्त मी हे सांगते आहे, असे नीना म्हणाल्या.