जिंकलस..! नेहा कक्कर पुन्हा एकदा आली मदतीला धावून, उत्तराखंडमधल्या बेपत्ता कामगारांच्या कुटुंबाला केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 03:33 PM2021-02-25T15:33:47+5:302021-02-25T15:34:45+5:30
नेहा कक्करने उत्तराखंडातल्या बेपत्ता झालेल्या कामगारांच्या कुटुंबाना ३ लाख रुपये देऊन मदत केली आहे.
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हर्ष आणि भारती हे जोडपे इंडियन आयडॉल १२चे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या ‘इंडिया की फर्माईश’ विशेष भागात स्पर्धक आपल्या चाहत्यांच्या पसंतीची गाणी म्हणताना दिसतील.
पवनदीपने आपले गाणे सादर करण्यापूर्वी सांगितले, ‘आज मी जे गाणे म्हणणार आहे, ते माझ्या वडिलांनी सुरेश राजन यांनी स्वरबद्ध केलेले आहे. ज्याचे बोल आहेत, ‘मालवा में कां करू तलाश’ (उत्तराखंडी गाणे). हे गाणे अलीकडेच चमोली जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात जे लोक बेपत्ता झाले आहेत, त्यांना समर्पित आहे. या आपदेत शेकडो कुटुंबांची वाताहत झाली. आपणा सगळ्यांना माहीतच आहे की, तिकडे तैनात असलेले कर्मचारी बेपत्ता झालेल्या कामगारांचा शोध घेत आहेत. पण मी देखील कर्तव्य म्हणून उत्तराखंडचे मुख्य मंत्री त्रिवेंद्र सिंह रावत जी यांना अशा कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन करतो, ज्या कुटुंबांनी त्यांचा एकुलता एक कमावता सदस्य गमावला आहे. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांनी स्वरबद्ध केलेले गाणे म्हटले आणि शेवटी ‘हमारी आधुरी कहानी’ म्हटले.
त्याचा परफॉर्मन्स पाहून नेहा काहीशी भावुक झाली आणि पवनदीपचे कौतुक करताना म्हणाली, “तू अद्भुत गायक आहेस, हे तर आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे, पण तू एक खूप चांगला माणूस आहेस, जे महत्त्वाचे आहे. बेपत्ता झालेल्या कामगारांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी तू धावून आलास आणि सगळ्यांनी त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मदत करावी असे आवाहन तू आपल्या मर्यादेत राहून केलेस. उत्तराखंडच्या बेपत्ता झालेल्या कामगारांच्या कुटुंबांसाठी मी ३ लाख रुपये देऊ इच्छिते आणि इतर सर्वांनीही या लोकांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन मी करते. ती एक प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती होती आणि या कुटुंबांना सध्याच्या अत्यंत बिकट परिस्थितीत मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.”
तिने पुढे सांगितले की, आज ‘मौसम बदल गया’च्या जल्लोषाऐवजी आपण या संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी प्रार्थना करूया.