नेटफ्लिक्सने मंत्रालयातील बैठकीनंतर IC814 मध्ये केला बदल; हिंदू नावांवरून होता वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:22 PM2024-09-03T18:22:56+5:302024-09-03T18:33:24+5:30
मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर नेटफ्लिक्सने 'IC 814' या वेबसिरीजबाबत निवेदन जारी केले आहे.
Netflix IC814 Controversy :नेटफ्लिक्सच्या 'IC 814' या वेबसिरीजवरून सध्या बराच वाद सुरू आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीनने १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणावर आधारित या वेब सीरिजबाबत भारत सरकारने भाष्य केलं होतं. त्यानंतर सरकारने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेडला समन्स पाठवून स्पष्टीकरण मागितले. सीरिजमध्ये अपहरणकर्त्यांची नावांवरुन सुरु झालेल्या या वादानंतर नेटफ्लिक्सने IC814 मध्ये बदल केले आहेत. नेटफ्लिक्स याबाबत स्पष्टीकरण देत बदल केल्याची माहिती दिली.
शेकडो सोशल मीडिया युजर्संनी नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांनी या वेब सिरीजमध्ये अपहरणकर्त्यांची नावे जाणूनबुजून भोला आणि शंकर अशी ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला समन्स पाठवलं होतं. नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना वेब सीरिजच्या कथित वादग्रस्त पैलूंवर स्पष्टीकरण देण्यासाठी मंगळवारी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आता वेब सीरिजमध्ये बदल केल्याचे नेटफ्लिक्सने स्पष्ट केलं.
नेटफ्लिक्सने मंगळवारी IC 814 - The Kandahar Hijack या वेब सीरिजमध्ये बदल केले. आता अपहरणकर्त्यांची खरी आणि सांकेतिक नावे वेब सीरिजच्या सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्येच दिसतील असे नेटफ्लिक्सने म्हटलं आहे. दहशतवाद्यांना दिलेल्या हिंदू नावांवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले होते. यानंतर नेटफ्लिक्सच्या इंडिया कंटेंट हेड मोनिका शेरगिल आज मंत्रालयात पोहोचल्या होत्या.
या वेब सीजिमध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहरण करणारे दहशतवादी संपूर्ण घटनेत खऱ्या नावांऐवजी बर्गर, चीफ, शंकर आणि भोला अशी सांकेतिक नावे वापरताना दिसले होते. सोशल मीडियावर लोकांनी अपहरणकर्त्यांच्या हिंदू नावांवर आक्षेप घेतला. दहशतवाद्यांची खरी नावे लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
"आम्ही अपहरणकर्त्यांची खरी आणि सांकेतिक नावे मालिकेत समाविष्ट करू. दर्शकांसाठी ती सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्येच दिसतील. सध्या मालिकेतील सांकेतिक नावे ही वास्तविक घटनेच्या वेळी वापरलेली नावे आहेत. आम्ही प्रत्येक कथेचे मूळ प्रतिनिधित्व करण्यासाठी वचनबद्ध आहोत," असे नेटफ्लिक्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Netflix India issues an official statement addressing the controversy around its original, IC814- The Kandahar Attack- "... For the benefit of audiences unfamiliar with the 1999 hijacking of the Indian Airlines flight 814, the opening disclaimer has… pic.twitter.com/KpfFuWJXtB
— ANI (@ANI) September 3, 2024
दरम्यान, 'भोला' आणि 'शंकर' ही त्यांची सांकेतिक नावे होती. २००० मध्ये गृहमंत्रालयाच्या निवेदनातही याचा उल्लेख आहे. मात्र, निर्मात्यांनी वेब सीरिजमध्ये हे स्पष्ट करायला हवे होते, असे समीक्षकांचे मत आहे. आता, नेटफ्लिक्सने खुलासा केला आहे की ते शोमध्ये दहशतवाद्यांच्या खऱ्या नावांसह एक डिस्क्लेमर जोडणार आहेत.