शोलेच्या चित्रीकरणाच्यावेळी धर्मेंद्र यांनी चालवली होती अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी, वाचा हा किस्सा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 06:28 PM2020-12-25T18:28:06+5:302020-12-25T18:30:13+5:30
कौन बनेगा करोडपतीच्या चित्रीकरणाच्यावेळेस अमिताभ यांनी शोले या चित्रपटातील चित्रीकरणाच्यावेळेचा एक रंजक किस्सा सांगितला.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. अमिताभ बच्चन या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत मनसोक्त गप्पा मारतात. आपल्या आयुष्यातील अनेक किस्से ते स्पर्धकांना सांगतात. नुकताच त्यांनी एका भागात शोले या चित्रपटातील चित्रीकरणाच्यावेळेचा एक रंजक किस्सा सांगितला.
कोन बनेगा करोडपतीच्या नुकत्याच झालेल्या भागात प्रीत सिंह नावाचे गृहस्थ हॉट सीटवर बसले होते. त्यांनी या कार्यक्रमात सांगितले की, त्यांची पत्नी शोले या चित्रपटाची फॅन आहे. हे ऐकताच अमिताभ यांनी शोले या चित्रपटातील एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, शोले या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका दृश्यात धर्मेंद्र यांना गोळ्या उचलायच्या होत्या. त्यामुळे जय म्हणजेच अमिताभ यांचे प्राण वाचतात. पण चित्रीकरण करत असताना धर्मेंद्र खाली उभे होते तर मी डोंगरावर उभा होतो. धर्मेंद्र यांना अतिशय वेगाने गोळ्या उचलायच्या होत्या. पण त्यातील अनेक गोळ्या खाली पडत होत्या. त्यामुळे दृश्याचे सतत चित्रीकरण करावे लागत होते. धर्मेंद्र अनेक रिटेक देऊन कंटाळले होते. त्यामुळे त्यांना इतका राग आला की, त्यांनी सगळ्या गोळ्या घेतल्या आणि त्या बंदुकीत भरल्या आणि ती बंदूक उचलली आणि ती चालवली. मी डोंगरावर उभा असल्याने गोळी माझ्या कानाला चाटून गेली. ती गोळी खरी होती. पण माझे भाग्य चांगले असल्याने मी वाचलो.
शोले या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटातील जय, वीरू, बसंती, ठाकूर, गब्बर या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. आजही या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील सगळे संवाद देखील आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटातील सगळी गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शोले या चित्रपटातील अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया बच्चन, अमजद खान यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतक करण्यात आले होते.