पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:43 AM2018-07-29T04:43:26+5:302018-07-29T10:02:25+5:30

सिनेसृष्टीच्या स्थित्यंतराची अनेक वर्ष साक्षीदार असलेल्या दिंदीची या चित्रपटसृष्टीत एंट्री कशी झाली? हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी केलेली वाटचाल, आलेले अनुभव, सध्याच्या सिनेसृष्टीबद्दल नेमकं काय वाटतंय? अशा विविध विषयांवर वाढदिवसाच्या निमित्ताने सुलोचनादिदींशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजय परचुरे यांनी कॉफी टेबलअंतर्गत मारलेल्या गप्पा.

Next time, I want to be an actress ... | पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय...

पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय...

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच तमाम भारतीय सिनेसृष्टीच्या लाडक्या सुलोचनादिदी. सुलोचनादिदी येत्या सोमवारी ९०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वाढदिवसाबरोबरच भारतीय सिनेसृष्टीत येऊन दिदींना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. १९४३ला दिदींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सिनेसृष्टीच्या स्थित्यंतराची अनेक वर्ष साक्षीदार असलेल्या दिंदीची या चित्रपटसृष्टीत एंट्री कशी झाली? हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी केलेली वाटचाल, आलेले अनुभव, सध्याच्या सिनेसृष्टीबद्दल नेमकं काय वाटतंय? अशा विविध विषयांवर वाढदिवसाच्या निमित्ताने सुलोचनादिदींशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजय परचुरे यांनी कॉफी टेबलअंतर्गत मारलेल्या गप्पा.

दीदी तुमच्या सिनेकरिअरला नेमकी सुरुवात कधी झाली ?
माझा जन्म कोल्हापुरातील खडकलाट या अगदी छोट्याशा गावातला. लहानपणी मला मुळातच असं वाटलं नव्हतं की, आपण पुढे जाऊन सिनेमात काम वगैरे करू. आमच्या गावात तसं वातावरणही नव्हतं. मात्र, लहान असताना मी माझ्या मावशीसोबत आमच्या गावात पडद्यावरचा सिनेमा पाहायला जायचे. त्या पडद्याच्यामागे कोण असतं? त्यांचं नेमकं काम कसं होतं? याबद्दल मात्र मला खूप उत्सुकता होती. त्याच उत्सुकतेपोटी मी लहानपणी हा पडद्यावरचा सिनेमा गावात आल्यानंतर, पडद्याच्यामागे काय होतं, हे पाहण्यासाठी जायचे. तसंही मला शाळेत जाण्याचा फार कंटाळा यायचा, मी फारच खोडकर होते, पण या खेळण्या-बागडण्याच्या वयातही मला वाटलं नव्हतं की, मी पुढे जाऊन सिनेमात काम करणार आहे. माझ्या मावशीच्या ओळखीने आम्ही बाबांच्या (भालजी पेंढारकर) जयप्रभा स्टुडिओत पोहोचलो आणि आमची सिनेमातील खरी शाळा सुरू झाली.

बाबांकडे कसं वातावरण होतं? तुम्हाला तिथे काय शिकायला मिळालं ?
बाबांचा जयप्रभा स्टुडिओ आमच्यासाठी एनएसडीसारखा होता. माझ्याबरोबर इतरही काही मुलंमुली होती. त्या काळातील सर्व दिग्गज कलाकार बाबांच्या स्टुडिओमध्ये यायचे. मराठीमधील दुर्गाबाई खोटे, शांता आपटे, शोभना समर्थ या अभिनेत्रींना मी खूप जवळून पाहिलं आहे. पृथ्वीराज कपूर यांचं त्या काळात खूप मोठं नाव होतं. या सर्व मोठ्या स्टार्सना शूटिंग करताना मी अगदी जवळून पाहिलं आहे. मी त्या वेळी जयप्रभा स्टुडिओमध्ये नोकरीला होते. मला महिना ३० रुपये पगार मिळायचा आणि माझं काम होतं, फक्त सिनेमाचं शूटिंग पाहणे. बाबांनी आम्हाला सांगितले होतं. प्रत्येक शूटिंग, त्यातील प्रसंग हे बारकाईने पाहा. त्यातूनच तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. खरं सांगू बाबांनी सांगितलेल्या गोष्टींची त्या लहान वयात इतकी समज नव्हती, पण बाबांनी सांगितलंय, म्हणून आम्ही अगदी नित्यनियमाने जयप्रभा स्टुडिओत होणारे सर्व शूटिंग्ज पाहायचो. त्यातून आम्ही कितपत शिकलो हे नाही सांगू शकणार, पण पुढच्या वाटचालीसाठी मला याचा खूप फायदा झाला. बाबा खूप कडक नव्हते, पण शिस्तप्रिय होते. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि वेळेतच झाली पाहिजे, असा त्यांचा दंडक असायचा. त्याप्रमाणे, त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी घडायच्या. याचा मोठा फायदा मला त्यापुढे झाला.

‘वहिनीच्या बांगड्या’ या सिनेमातील व्यक्तिरेखेने तुम्हाला महाराष्ट्रातील घराघरांत ओळख मिळवून दिली. त्याविषयी काय सांगाल?
त्या काळात ऐतिहासिक, पौराणिक किंवा मारधाड करणाऱ्या सिनेमांची प्रचंड लाट होती. ‘वहिनीच्या बांगड्या’ हा एक कौटुंबिक सिनेमा होेता. त्या काळात येणाºया सिनेमांपेक्षा याचा विषय वेगळा असल्याकारणाने प्रेक्षकांना आमचा सिनेमा खूप भावला. यातील माझ्या व्यक्तिरेखेचंही खूप कौतुक झालं. मला या भूमिकेमुळे घरांघरांत ओळख निर्माण करून दिली.

हिंदी सिनेमांचं आकर्षण होतं, म्हणून तुम्ही त्याकडे वळलात का?
हो, मला हिंदी सिनेमाचं आकर्षण होतं. कारण मराठी सिनेमाचं शूटिंग कोल्हापूर आणि पुण्याच्या पुढे होत नव्हतं. हिंदी सिनेमाचा एक वेगळा आब होता. मुंबईत चालणारी शूटिंग्ज ही कोल्हापूर आणि पुण्यापेक्षा वेगळी होती आणि आपल्या भाषेच्या पलीकडे जाऊन जर चांगल्या व्यक्तिरेखा मिळत असतील, तर नक्कीच मला हिंदीत काम करावंसं वाटत होतं.

हिंदी भाषेची कधी अडचण वाटली का? त्यावर तुम्ही कशी मात केली?
तशी तर अडचण मला मराठीमध्येही होती. कारण मी मुळात कोल्हापूरची. आमची गावची भाषा. त्यामुळे मराठी सिनेमात काम करताना भाषा सुधारण्यासाठी मला बाबांनी खूप मदत केली. त्यांनी अनेक भाषेची पुस्तकं वाचायला दिली. ती वाचून आणि इतर कलाकारांची भाषा ऐकून-ऐकून त्याची उजळणी करता-करता माझं मराठी उत्तम झालं. हिंदीत कामाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला माझे हिंदीचे उच्चार हे अस्खलित येत नसत. बोलण्याला एक मराठी टच होता. मग त्यात सुधारणेसाठी मी पुन्हा एकदा बाबांकडे गेले. त्यांनी परत मला संस्कृतमधली काही पुस्तकं दिली, पण या वेळी मात्र मला ही पुस्तकं वाचूनही काही एक फायदा होत नव्हता आणि वाचन तरी किती करायचं. त्या काळात मी तीन शिफ्टमध्ये काम करत असे. मिळालेल्या वेळेत वाचनकाम सुरू असायचं. मात्र, म्हणावी तशी प्रगती नव्हती आणि मला एक गोष्ट सुचली. मी रात्री उशिरा घरातील सर्व झोपल्यानंतर लतादिदींच्या आवाजातील हिंदी गाणी ऐकायचे आणि त्या शब्दांना परत परत उच्चारत बसायचे. असं मी अनेक दिवस केलं. कालांतराने माझ्या हिंदीतही खूप सुधारणा झाली. मी गमतीत लतादिदी कुठे भेटल्या की त्यांना सांगायचे की, ‘दिदी, तुमच्या गाण्यांनी माझ्या हिंदी बोलण्यात फरक पडला.’

सुजाता या सिनेमाने तुम्हाला ओळख मिळवून दिली. हा सिनेमा तुम्हाला कसा मिळाला?
‘सुजाता’ सिनेमाची एक गंमत आहे. बिमल रॉयनी जेव्हा या सिनेमामध्ये काम करण्याविषयी मला विचारणा केली. तेव्हाच ठरविलं होतं की, मी या सिनेमात काम करणार. कारण त्या काळात बिमल रॉयसोबत काम करण्यासाठी मोठे-मोठे कलाकारही धडपडत असत. मला तर ही आयती संधी चालून आली होती. बिमल रॉयनी मला ‘सुजाती’ची कथा ऐकविली. मात्र, कथा ऐकून मी इतकी खूश नव्हते. कारण करिअरच्या सुरुवातीला इतक्या लवकर आईची भूमिका करण्याबाबत मी उत्साही नव्हते. मात्र, बिमल रॉय यांचा सिनेमाही सोडायचा नव्हता. तेव्हा मला दुर्गाबाई खोटे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. ‘अगं, जी भूमिका वाट्याला येईल ती कर. कदाचित, हीच भूमिका तुझी अजरामर होईल.’ आणि नंतर झालंही असंच, ‘सुजाता’ने मला खूप मोठी ओळख मिळवून दिली.

आत्ताच्या इंटस्ट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हा काळाचा बदल आहे. आमच्या काळात सिनेमाचं शूटिंग करण्यापूर्वी १२ ते १३ दिवस त्या सिनेमातील प्रत्येक सीनची तालीम केली जायची. मात्र, आता तसं वातावरण नाहीये. तंत्रज्ञान बदललं आहे, सिनेमाचं अर्थकारण दरदिवशी बदलतंय. अनेक तरुण दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ अगदी लहान वयात उत्तम सिनेमे बनवत आहेत. वाहिन्याही वाढल्यात, त्यामुळे कलाकारांना कामंही खूप मिळत आहेत. सिनेमाचं तंत्र पूर्णपणे बदलतोय. मी यातले काही मोजके सिनेमे पाहिले. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ असे काही उत्तम सिनेमे बनलेत, जे मी पाहिलेत आणि मला ते खूप आवडले.

या वयातही एखाद्या सिनेमात काम करण्याची इच्छा आहे का?
आता मी ९० वर्षांची झाली आहे. काम करण्यासाठी माझ्यात पहिल्यासारखा उत्साह असला, तरी वयोमानाप्रमाणे तितकी शारीरिक हालचाल आता होत नाही. मात्र, माझ्या वेळेनुसार आणि शारीरिक ताकदीनुसार मला कुठली भूमिका करण्याची संधी मिळाली, तर ती मी नक्की करीन.

९०व्या वाढदिवशी काय सांगावसं वाटतं?
माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. मी अत्यंत समाधानी आहे की, मला दिग्गज दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या जन्माप्रमाणेच मला पुढच्या जन्मातही अभिनेत्रीच व्हायला आवडेल. या जन्माप्रमाणेच पुढच्या जन्मातही माझा जन्म आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापुरातील माझ्या खडकलाट या गावी माझ्या याच जन्मातील आई-वडिलांच्या घरात व्हावा. या जन्माप्रमाणे माझी सुरुवात कोल्हापूरपासून सुरू व्हावी आणि हळूहळू मराठी व नंतर हिंदी सिनेमांमध्ये माझी वाटचाल व्हावी, अशी माझी इच्छा आहे.

तुम्ही नंतर चरित्र अभिनेत्री म्हणूनही मराठी आणि हिंदीतही अनेक सिनेमे केले. अमिताभ बच्चन यांना तुम्ही सुरुवातीच्या काळात पाहिलं होतं. त्यांच्याबद्दलचे अनुभव कसे होते?
अमिताभ बच्चन पुढे जाऊन बॉलीवूडचे सुपरस्टार होतील, असा त्या काळात कोणीही अंदाज बांधला नव्हता. मुळात त्यांचे आधीचे काही सिनेमे फ्लॉप गेल्यामुळे हा कोण अभिनेता आहे? याला कोणी घेतला सिनेमात अशी दुषणं ही त्यांना मिळत होती, पण सुरुवातीच्या काळात मी त्यांच्यासोबत अनेक सिनेमात सहकलाकार म्हणून काम केलं होतं. ते आपल्या कामाबद्दल खूप प्रामणिक होते. दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे, शिकविल्याप्रमाणे ते आपलं काम मेहनतीने आणि अगदी चोख करीत असत. शूटिंगच्या दरम्यान त्यांचं काम मी फार जवळून पाहिलं होतं. त्यामुळे पुढे जाऊन अमिताभ बच्चन हे हिंदी सिनेसृष्टीतील मोठं नाव असेल, याचा मला अंदाज होताच आणि सेटवरील माणसांना किंवा आमच्या सहकलाकारांना मी हे कित्येक वेळा बोलून दाखवलंय.

Web Title: Next time, I want to be an actress ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई