निखिलचा आनंद गगनात मावेना
By Admin | Published: July 7, 2017 05:25 AM2017-07-07T05:25:53+5:302017-07-07T05:25:53+5:30
‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे नाटक काहीच महिन्यांपूर्वी लोकांच्या भेटीस आले आहे. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजवर भाष्य करणाऱ्या या नाटकाला
‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे नाटक काहीच महिन्यांपूर्वी लोकांच्या भेटीस आले आहे. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजवर भाष्य करणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. या नाटकात पुष्कर श्रोती, सचिन देशपांडे, निखिल राऊत, माधवी निमकर, तन्वी पालव प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकात निखिल राऊत वसंत ही भूमिका साकारत आहे. त्याच्या वसंत या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. नाटक पाहायला आलेली मंडळी नाटक संपल्यावर आवर्जून निखिलला ग्रीन रूममध्ये भेटायला जात आहेत आणि त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. निखिलच्या भूमिकेला समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. त्याचसोबत त्याला या नाटकासाठी एका पुरस्कार सोहळ्यात नामांकनदेखील मिळाले आहे. यामुळे सध्या निखिल खूपच खूश आहे. आपला हा आनंद व्यक्त करताना निखिल सांगतो, नाटक हा माझा जीव की प्राण आहे. नाटकात काम करणे हे माझे पहिल्यापासूनचे स्वप्न होते. मी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण नाटकात काम करण्याची मजाच वेगळी असते. रंगभूमीवर काम करताना एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते. नाटकात काम करत असताना रसिक तुम्हाला भेटायला येतात. तुमच्या कामाचे कौतुक करतात. प्रत्येक कलाकारासाठी प्रेक्षकांची पावती मिळणे हे अतिशय महत्त्वाचे असते. माझ्या सुरक्षित अंतर ठेवा या नाटकातील कामाला लोक चांगला प्रतिसाद देत आहे. त्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांचे प्रेम मिळणे आणि पुरस्कारावर नाव कोरले जाणे हे कोणाला आवडत नाही. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मला भविष्यात अनेक पुरस्कार मिळतील याची मला खात्री आहे.