नुसरतने लग्न अवैध ठरवताच पहिल्यांदाच बोलला पती निखील जैन; वाचा, काय केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:13 PM2021-06-09T18:13:00+5:302021-06-09T18:22:37+5:30
नुसरत म्हणाली, त्या लग्नाला काहीही अर्थ नव्हता...; पती निखील म्हणाला,...
बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) गर्भवती असल्याचा दावा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी केला आणि यानंतर भलतीच चर्चा रंगली. नुसरत गर्भवती असून याबद्दल तिचा पती निखील जैन (Nikil Jain) याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले गेले. पाठोपाठ नुसरत व निखील विभक्त झाले असल्याचेही म्हटले गेले. या चर्चा सुरू असताना नुसरत जहाँने एक निवेदन काढून माझाआणि निखिल जैनचा कोणताही वैवाहिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आमचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत झाले आहे आणि हा विवाह सोहळा पूर्णपणे अवैध ठरला होता. कारण हे दुस-या एका धर्मातील व्यक्तीशी लग्न होते आणि सामाजिक विवाह कायद्यानुसार याची अधिकृत नोंदणी होणं गरजेचं होतं, पण ती झाली नव्हती. यामुळे या लग्नाला काहीही अर्थ नव्हता. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो,असे नुसरतने या निवेदनात स्पष्ट केले.
आत्तापर्यंत नुसरतचा पती निखील जैन या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून होता. पण आता त्यानेही यावर भाष्य केले आहे. (Nikhil Jain comment on marriage separation to Nusrat Jahan )
काय म्हणाला निखील?
माझ्या मते, नुसरत व माझे लग्न कायदेशीर होते, मात्र तिने जे काही सांगितले आहे, त्यावर मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. आमचा मुद्दा दिवाणी न्यायालयात पोहोचला आहे आणि खटला न्यायालयात असेपर्यंत मी यावर कोणते मत व्यक्त करू शकणार नाही. पण, दोघेही विभक्त झालो आहोत. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दोघेही स्वतंत्र राहत आहोत, असे त्याने स्पष्ट केले.
यश दासगुप्तासोबत नुसरत जहाँ रिलेशनशिपमध्ये?
मागील काही दिवसांपासून नुसरत जहाँ बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं आहे. त्याचसोबत न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघंही राजस्थानला गेले होते. मात्र या चर्चांवर नुसरत, निखिल आणि यश दासगुप्ता यांच्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आले नाही.
लग्नानंतर नुसरत जहाँ चर्चेत
नुसरत जहाँने तिचा बॉयफ्रेंड उद्योगपती निखील जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले होते. नुसरत आणि निखील यांचे लग्न हिंदू, इस्लाम प्रथा परंपरेनुसार झालं होतं. लग्नानंतर नुसरत जहाँने कपाळात सिंदूर लावून दुर्गा पुजेतही सहभागी झाली होती. तेव्हा अनेक कट्टरतावादी मुस्लिमांनी नुसरत जहाँवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला नुसरत जहाँनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.