Nilesh Sabale Birthday Special: अशी आहे निलेश साबळेची इंटरेस्टिंग Love Story
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 09:00 PM2019-06-30T21:00:00+5:302019-06-30T21:00:02+5:30
निलेश आणि गौरी यांचा प्रेमविवाह झालेला असून त्यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे डॉ. निलेश साबळे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. या कार्यक्रमातील त्याचा वावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. ‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’, असं म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करत निलेश साबळे सर्वांच्या भेटीला येतो आणि प्रेक्षकांचे मन जिंकतो. निलेशचा आज म्हणजेच ३० जूनला वाढदिवस असून त्याचे वडील शिक्षण खात्यात अधिकारी असल्याने त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे त्याचे बालपण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेले आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईत राहात आहे.
निलेशचे लग्न झालेले असून त्याच्या पत्नीचे नाव गौरी आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झालेले असून त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे. निलेश आणि गौरी यांचा प्रेमविवाह झालेला असून त्यांच्या प्रेमकथेविषयी होम मिनिस्टरमध्ये निलेश आणि गौरी यांनी सांगितले होते. त्यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्यांनी सांगितले होते की, निलेश आणि गौरी हे दोघे वेगवेगळ्या कॉलेजमधले असले तरी आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये त्यांची ओळख झाली. निलेश मिमिक्रीच्या तर गौरी गायनाच्या स्पर्धेत भाग घ्यायची. दोघे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असल्याने गौरीच्या परफॉर्मन्सच्यावेळी तिचा परफॉर्मन्स चांगला होऊ नये यासाठी निलेश आणि त्याचे मित्र टाळ्या, शिट्या वाजवून तिला सतवत होते. पण एका क्षणी निलेशला जाणवले की, ती खूप चांगली गातेय आणि त्याने त्याच्या मित्रांना शांत केले. तिने त्यावेळी कही ये वो तो नही है गाणे गायले होते. त्यानंतर गौरीच्या एका सिनिअरने निलेश आणि गौरीची ओळख करून दिली. त्यावेळी ते दोघे एकमेकांशी पहिल्यांदा बोलले. निलेश खूप चांगला मिमिक्री करतो, त्याची मिमिक्री बघ... असे तिच्या सिनिअरने गौरीला त्यावेळी सांगितले होते. त्या दिवशी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर देखील घेतले.
या भेटीनंतर कित्येक महिने ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. एकदा निलेशला गौरीच्या कॉलेजमधील एका कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. तिथे गौरी भेटेल या आशाने निलेश गेला, पण कार्यक्रम संपायला आला तरीही गौरीचा काहीही पत्ता नव्हता. निलेश निघणार तितक्यात त्याला गौरी दिसली. गौरीशी बोलताना निलेशच्या लक्षात आले की, त्याने तिचा चुकीचा नंबर लिहून घेतला होता. त्यांनी पुन्हा एकमेकांचे नंबर घेतले आणि त्या दिवसांपासून त्यांचे रोजचे फोनवर बोलणे सुरू झाले. गौरी आणि निलेश एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले होते. पण गौरी निलेशला आवडते हे सांगायची त्याला हिंमत होत नव्हती. निलेशला गौरी आवडते हे तिला तिच्या मैत्रिणींकडून कळले. गौरी आणि निलेश ओम शांती ओम हा चित्रपट पाहायला गेले होते. त्यावेळी शेवटी न राहावून गौरीनेच निलेशला विचारले की, तुला मी आवडते असे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले. तू मला याविषयी काही सांगणार आहेस की मीच माझ्या मनातले सगळे सांगून टाकू... त्यानंतर निलेशने गौरीला त्याच्या भविष्यातील योजनांविषयी मनमोकळेपणाने सांगितले होते. त्याने स्पष्ट केले होते की, मी डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलो तरी यात मला रस नाहीये. त्यामुळे मी हे क्षेत्र सोडून माझ्या आवडत्या क्षेत्रात करियर करेन. त्यावेळी गौरीचे एकच म्हणणे होते, तुला जे करायचे ते कर... माझी साथ कायम असेल.
निलेश हा आज अभिनेता असला तरी त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याने आज अभिनेता, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.