निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिला आजही आठवतो बाबांचा ‘तो’ सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:00 AM2021-07-13T06:00:00+5:302021-07-13T06:00:02+5:30
Nilu Phule's Death Anniversary: आपल्या रांगड्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल 40 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज स्मृती दिन...
‘बाई वाड्यावर या...’ हा संवाद आठवला की पाठोपाठ आठवतो तो एक रांगडा अभिनेता. होय, अनेक भूमिका अजरामर करणारे अभिनेते निळू फुले ( Nilu Phule ). आपल्या रांगड्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल 40 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज स्मृती दिन आहे. मराठी चित्रपट सृष्टीत जेव्हा पौराणिक व कौटुंबिक कथांचा काळ सुरु होता, तेव्हा फुले यांनी खलनायकी रूपात सिनेमाला तडका लावला. ‘एक गाव बारा भानगडी’ या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले, आणि त्यानंतर मागे वळून न पाहता, 2009 पर्यंत त्यांनी मायबाप प्रेक्षकांची सेवा केली. 13 जुलै 2009 रोजी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
निळू फुले आज आपल्यात नाही. पण त्यांची कन्या त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. होय, निळू फुले यांची कन्यादेखील अभिनय क्षेत्रात आहे. अनेक मालिकांमध्ये तुम्ही तिला पाहिले असेलच.
निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिका आठवत असेल तर त्यातली ईशाची आई सुद्धा तुम्हाला आठवत असेल. ही भूमिका गार्गी यांनी साकारली होती.
गार्गी विवाहित आहेत. 2007 साली त्यांनी ओंकार थत्ते यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. दोघांना अनय नावाचा मुलगा आहे.
दिली आयुष्यभराची शिकवण...
तू कॅमे-यासमोर उभी झालीस की, तू स्वत:ला अमिताभ बच्चन आहेस असेच समज... तुझ्यासमोर कितीही प्रसिद्ध कलाकार असला तरी तुझा अभिनय दमदार असलाच पाहिजे..., असे निळू फुले लेकीला नेहमी सांगत. त्यांची ही शिकवण आजही गार्गी यांच्या चांगलीच लक्षात आहे.
गार्गी यांनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेशिवाय ‘ कट्टी बत्ती’ या मालिकेत काम केले होते. ‘ कट्टी बत्ती’ या मालिकेच्या वेळीच त्यांना ‘तुला पाहते रे’ या मालिकेविषयी विचारण्यात आले होते. पण ‘कट्टी बत्ती’चे चित्रीकरण सुरु असल्याने त्यांनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी नकार दिला होता. पण या मालिकेचे निर्माते गार्गी यांच्यासाठी थांबले होते.