'निळूभाऊ...मी तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा'; प्रसाद ओकने केली खास घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:14 PM2022-04-04T15:14:57+5:302022-04-04T15:15:20+5:30
Nilu Phule : आपल्या रांगड्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज वाढदिवस आहे.
निळू भाऊ म्हणजेच निळू फुले (Nilu Phule) यांच्या आवाजात भारदस्तपणा होता. घोगर्या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भितीच्या कवेत घेऊन यायचा. ही ओळख होती निळू भाऊ अर्थात निळू फुले यांच्या असामान्य अभिनय क्षमतेची. त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव आणि संवाद हे निळू फुले यांचं खरं बलस्थान होतं. आज निळू फुले यांची जयंती असून या निमित्ताने अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने एक खास घोषणा केली आहे.
प्रसाद ओकने निळू फुलेंसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, निळूभाऊ...आज तुमचा वाढदिवस...!!! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं...अनुभवता आलं... तुमच्याकडून बरंच काही शिकलो... तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन "गुरु" च मानलं... तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली "गुरुदक्षिणा" असेल...!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ...!!!
निळू फुलेंवरील हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, यामध्ये कोण-कोण कलाकार असणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. निळू फुले यांच्या कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी देखील ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता प्रसाद ओकने निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या 'प्रेमाची गोष्ट' या नाटकातून दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केली होती. यामध्ये तो सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता.