फिल्म बाजारमध्ये यंदा नऊ मराठी चित्रपट
By Admin | Published: November 24, 2015 02:26 AM2015-11-24T02:26:12+5:302015-11-24T02:26:12+5:30
दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत (मुंबई फिल्मसिटी) यंदाच्या फिल्म बाजारमध्ये नऊ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन झाले आहे. यामध्ये ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाचाही समावेश आहे.
संदीप आडनाईक, पणजी
दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत (मुंबई फिल्मसिटी) यंदाच्या फिल्म बाजारमध्ये नऊ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन झाले आहे. यामध्ये ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाचाही समावेश आहे.
४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या फिल्म बाजारमध्ये इंडस्ट्री स्क्रिनिंग, द व्हिविंग रूम आणि प्रोड्युसर्स लॅब या तीन विभागांत एकूण नऊ मराठी चित्रपट दाखविण्यात आले. दिग्दर्शक मृणालिनी भोसले यांचा ‘कापूसकोंड्याची गोष्ट’, अतुल काळे यांचा ‘संदूक’, सचिन चव्हाण यांचा ‘नागरिक’, भाऊसाहेब कऱ्हाडे यांचा ‘ख्वाडा’, श्रीहरी साठे यांचा ‘एक हजाराची नोट’, नागेश भोसले यांचा ‘पन्हाळा’, अतुल जगदाळे यांचा ‘गणवेश’ आणि अभिजित पानसे यांचा ‘रेगे’ या मराठी चित्रपटांचे प्रदर्शन या फिल्म बाजारमध्ये झाले. यापैकी ख्वाडा या मराठी चित्रपटाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, तर एक हजाराची नोट या चित्रपटालाही इफ्फीमध्ये स्पेशल ज्युरींचा सन्मान मिळालेला आहे.
‘श्वास’ या गाजलेल्या मराठी चित्रपटापासून मराठी चित्रपटांकडे इतर निर्मात्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक झाला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर संदीप सावंत यांनी प्रथमच ‘नदी वाहते’ हा नवा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपटही या फिल्म बाजारमध्ये प्रदर्शित झाला.