"बॉलिवूडच्या बड्या लोकांशी नितीन देसाईंचा वाद, त्यानंतर.."; मनसे पदाधिकाऱ्याचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 08:39 PM2023-08-02T20:39:44+5:302023-08-02T20:41:01+5:30

"नितीन देसाईंवर दबाव होता, ते माझ्याशी याबद्दल बोलले होते"

Nitin Desai death case Bollywood big names were trying to boycott ND Studio claims MNS local leader Jitendra Patil | "बॉलिवूडच्या बड्या लोकांशी नितीन देसाईंचा वाद, त्यानंतर.."; मनसे पदाधिकाऱ्याचा गंभीर दावा

"बॉलिवूडच्या बड्या लोकांशी नितीन देसाईंचा वाद, त्यानंतर.."; मनसे पदाधिकाऱ्याचा गंभीर दावा

googlenewsNext

Nitin Desai Death vs Bollywood: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास कर्जत येथे एन डी स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले. आपल्या कल्पकतेने जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या नितीन देसाईंचा शेवट इतका विचित्र झाल्याने सिनेसृष्टीसह सामान्य चाहतावर्गही हळहळ व्यक्त करत आहे. मराठमोळ्या कलाकाराचा असा शेवट साऱ्यांच्याच मनाला चटका लावून गेला आहे. नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर आता, रायगडमधील एका मनसे पदाधिकाऱ्याने एक वेगळा आणि गंभीर दावा केला आहे.

नितीन देसाईंनी आत्महत्या केल्यामागचे कारण सध्या पोलीस तपासत आहेत. त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून शक्य त्या गोष्टी ताब्यात घेतल्या असल्याचे सांगण्यात आले. नितीन देसाई यांच्यावर सुमारे २५० कोटींच्या कर्जाचा डोंगर होता. या आर्थिक विवंचनेतून त्यांना हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यांच्या मृतदेहाच्या आसपास कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने यावर अनेक कंगोरे असल्याचे म्हटले जात आहे. तशातच रायगड जिल्ह्यातील मनसे जिल्ह्याध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या वेगळाच दावा केला आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले, "नितीन देसाई गेल्या अनेत दिवसांपासून चिंतेत होते. अनेक गोष्टींबाबत ते आमच्याशी चर्चा करत असत. त्यांच्यावर कर्जाची आर्थिक अडचण होती हे नक्कीच आहे. पण त्याशिवाय त्यांच्या क्षेत्रातून काही व्यक्ती मुद्दाम एन डी स्टुडिओमध्ये कामं किंवा शूटिंग येऊ देत नव्हते. त्यांनी हे सगळं मला सांगितलं होतं. बॉलिवूडमधले काही बडे लोक या स्टुडिओमध्ये काम येऊ देत नव्हते. त्यांचे या लोकांशी काही वाद झाले होते. त्यानंतर बरीच शूटिंग रद्ददेखील झाली. अशा वेळी स्टुडिओ चालवायला लागणाऱ्या आर्थिक गोष्टी बिघडल्या. या सगळ्याच गोष्टी संताप आणणाऱ्या होत्या. मी यावर योग्य वेळी नक्कीच बोलणार आहे"

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे. चित्रपट, कला क्षेत्रामध्ये नितीन देसाई यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन देसाई यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबिंयांवर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना करुन देसाई यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Nitin Desai death case Bollywood big names were trying to boycott ND Studio claims MNS local leader Jitendra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.