नितीन देसाईंनी अवघ्या २० तासांत उभारलं होतं ठाकरेंच्या शपथविधीसाठी भव्य व्यासपीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:25 AM2023-08-02T11:25:21+5:302023-08-02T11:25:50+5:30
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याने अनेकांचे डोळे दिपले होते.
मुंबई – प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन देसाईंनी उचललेल्या या टोकाच्या पाऊलाने बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीही हादरली आहे. नितीन देसाई यांच्या कलेचे कौतुक सगळीकडे होत असायचे. असाच एक किस्सा म्हणजे २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार होते. ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पदावर विराजमान होणार होती. त्यासाठी उभारण्यात येणारे व्यासपीठही तितकेच भव्य असले पाहिजे असं सर्वांना वाटत होते. तेव्हा दादरच्या शिवतीर्थावर भव्य व्यासपीठ उभारण्याचं काम नितीन देसाई यांना देण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याने अनेकांचे डोळे दिपले होते. भव्यदिव्य व्यासपीठ, त्यावर छत्रपती शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा उभारला होता. परंतु ही सगळी व्यवस्था अवघ्या २० तासांत झाली होती. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना हे काम दिले होते. नितीन देसाई यांनी बॉलिवूडमध्ये लगान, देवदास, जोधा अकबर यासारख्या सिनेमांचे सेट उभारले होते. नितीन देसाईंना त्यांच्या कलेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठ तयार करण्याची जबाबदारी नितीन देसाई यांच्यावर सोपवली होती.
नितीन देसाई यांनी या स्टेजचे डिझाईन तयार केले. त्यानंतर छोटे मॉडेल घेऊन उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली. त्यांना ते खूप पसंत आले. त्यानंतर नितीन देसाईंनी कामाला सुरुवात केली. नितीन देसाईंनी या मॉडेलचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नितीन देसाई म्हणाले होते की, आम्हाला पूर्ण तयारी करायला केवळ २० तास शिल्लक होते. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा क्षण होता. त्यामुळे आम्ही सर्व झपाटून कामाला लागलो. उद्धव ठाकरे स्वत: आर्टिस्ट होते. बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करण्याचीही अनेकदा संधी आली. उद्धव ठाकरेंच्या आवडीनुसार सर्वकाही उभारले होते असं त्यांनी म्हटलं होते.
कसं होतं व्यासपीठ?
मंचावर मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा होता. 'जो राज्य करतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो. त्यांचे नाव घेऊनच राज्याचे काम पुढे नेले पाहिजे. उद्धव ठाकरेंना छत्रपती शिवरायांबद्दल खूप आपुलकी आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या नावाने करणे पसंत करतात. ही गोष्ट पाहून ही योजना आखण्यात आली होती असं नितीन देसाईंनी म्हटलं. शपथविधी सोहळ्याला सुमारे ६० हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती.