बिग बी डीप फेकप्रकरणी आरोपीला दिलासा नाही; तपासात अडथळे येण्याचा मुद्दा ग्राह्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 05:51 AM2024-07-08T05:51:13+5:302024-07-08T05:51:21+5:30
उत्तराखंडस्थित आयुर्वेद संस्थेच्या मालकाला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाचा नकार
मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांचा डीपफेक व्हिडीयो तयार करून पोस्ट केल्याप्रकरणी उत्तराखंडस्थित आयुर्वेद संस्थेच्या मालकाला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी नकार दिला.
ऋषिकेशमध्ये आयुर्वेद फर्म चालवणाऱ्या अभिजित पाटील याला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. एम. पठाडे यांनी नकार दिला.
पाटील याच्या कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात करताना दाखवणारे अमिताभ बच्चन यांचे अनेक डीपफेक व्हिडीयो सोशल मीडियावर आल्यानंतर, बच्चन यांनी मे महिन्यात सायबर पोलिसांत गुन्हा नोंदवला होता.
आरोपीने लैंगिक आरोग्यावरील उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे अश्लील डीपफेक व्हिडीयो तयार केले आणि पोस्ट केले. अटकेच्या भीतीने आरोपीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
पोलिसांनी त्याच्या अर्जावर आक्षेप घेतला. सायबर गुन्ह्यांमधील आरोपीला आपल्याला जामीन मिळेल, असे वाटते. त्यामुळे ते अश्लील व्हिडीयो बनविण्यासाठी सेलिब्रेटींची ओळख वापरतात, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी आरोपीला दिलासा दिल्यास तपासात अडथळे येतील, असे न्यायालयाला सांगितले.
आरोपीने डीपफेक तयार करून आणि अश्लील भाषा वापरून जनतेची आणि अभिनेत्याच्या चाहत्यांची फसवणूक केली आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढील ढकलली.
आरोपीची टंगळमंगळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील याच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यातून आरोपीने डीपफेक व्हिडीयो तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे उघड झाले. आरोपी पाटील याला ४ जुलै रोजी सायबर पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली होती, परंतु शहरात येऊनही तो पोलिसांसमोर हजर झाला नाही, असे त्यांनी सांगितले.