राजकारण्यांच्या धुळवडीचा आवाज...

By Admin | Published: July 6, 2015 06:35 AM2015-07-06T06:35:02+5:302015-07-06T06:35:02+5:30

कुणाच्या आयुष्यात कधी कुठले वळण येईल हे सांगता येत नाही; तसेच कुणाचे नशीब कधी पालटेल याचीही खात्री देता येत नाही.

The noise of politicians ... | राजकारण्यांच्या धुळवडीचा आवाज...

राजकारण्यांच्या धुळवडीचा आवाज...

googlenewsNext

राज चिंचणकर
कुणाच्या आयुष्यात कधी कुठले वळण येईल हे सांगता येत नाही; तसेच कुणाचे नशीब कधी पालटेल याचीही खात्री देता येत नाही. मिळालेल्या संधीचा वापर कसा करून घ्यायचा, हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. या प्रवाहात ती व्यक्ती एखादे उत्तुंग शिखरही गाठू शकते किंवा जमीनदोस्तही होऊ शकते. अशा प्रकारचा बाज घेत आणि त्याला राजकीय पार्श्वभूमीची जोड देत ‘ढोलताशे’ हा चित्रपट राजकीय पटावरच्या सोंगट्या मागेपुढे सरकवत जातो आणि ढोलताशांचा हा आवाज कानात घुमतो.
अमेय हा तरुण आयटी क्षेत्रात करीत असलेली नोकरी मंदीमुळे गमावून बसतो. त्याचा मित्रपरिवार म्हणजे ढोलताशांचे पथक असते. अमेयला या पथकाद्वारे काही तरी सामाजिक काम करावेसे वाटू लागते आणि तो त्याला प्रोफेशनल टच देण्याचा प्रयत्न करतो. आदित्य देशमुख या युवा राजकीय पक्षनेत्याची नजर अमेयवर पडते आणि अमेयच्या कामाने तो प्रभावित होतो. अमेयला राजकीय वातावरणात आणण्यासाठी आदित्य थेट ‘ढोलताशा आघाडी’ अशी संघटना निर्माण करतो आणि अमेयला तिचा प्रमुख बनवतो. अमेयची पत्रकार असलेली प्रेयसी गोजिरी आणि अमेयच्या घरच्यांना त्याची ही राजकीय ओढ अजिबात पटत नाही. परिणामी त्यांच्यात तणाव निर्माण होतो.
आदित्य देशमुख अमेयचे संघटनेतले महत्त्व प्रचंड वाढवून ठेवतो आणि अमेयही त्यात पूर्ण वाहवत जातो. आदित्यच्या मनात नक्की काय असते आणि अमेय पुढे कुठल्या वळणावर येऊन पोहोचतो, याची कहाणी हा चित्रपट सादर करतो.
दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी ढोलताशांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुळवडीचा खेळ यात रंगवला
आहे. तसेच संपूर्ण चित्रपटातून ‘ढोलताशा’ हा केंद्रबिंदू सुटू न
देण्याची योग्य ती खबरदारी त्यांनी घेतली आहे. त्या दृष्टीने हा
ढोलताशा वाजला आहे. पण यात राजकीय नेते दाखवताना त्यांना दिलेली देहबोली आणि संवादफेक वर्तमान राजकीय क्षेत्राशी मिळतीजुळती ठेवण्याचा मोह त्यांना आवरता आलेला नाही. काका-पुतण्याचा संदर्भ घेत एका राजकीय पक्षाचे प्रतिबिंब यात पडलेले दिसते. हा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट होत राहते आणि हे सर्व टाळता आले असते तर अधिक चांगले झाले असते.
अभिजित खांडकेकर याने यात अमेय रंगवला आहे आणि त्याला मिळालेली ही भूमिका त्याच्यादृष्टीने महत्त्वाची ठरू शकेल. साधासुधा तरुण, ढोलताशा पथकातला कार्यकर्ता ते राजकीय नेतृत्वापर्यंतचा त्याने रंगवलेला प्रवास चांगला आहे. हृषिता भट्ट हिने गोजिरीच्या भूमिकेत त्याला चांगली साथ दिली आहे. यात जास्त भाव खाऊन गेला आहे तो आदित्य देशमुख साकारणारा जितेंद्र जोशी! राजकारणातल्या बेरकीपणाचा अस्सल नमुना पेश करीत राजकीय खेळी खेळणारा नेता त्याने दमदारपणे साकारला आहे. एका राजकीय नेत्याची तो सतत आठवण करून देतो; नव्हे त्याची व्यक्तिरेखाच तशीच बेतली आहे आणि जितेंद्रने ती रंगवली आहे. प्रदीप वेलणकर, इला भाटे आदी कलावंतांची साथ या चित्रपटाला असून, एकूणच एक समाधानकारक प्रयत्न चित्रपटातून केलेला दिसून येतो.

दर्जा : बरा

Web Title: The noise of politicians ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.