‘स्टारडमची भीती नाही’
By Admin | Published: January 22, 2017 02:42 AM2017-01-22T02:42:57+5:302017-01-22T02:42:57+5:30
बॉलिवूडचा ‘किंग खान’, अर्थात शाहरुख खान याचा ‘रईस’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शाहरुखने त्याला मिळालेली प्रसिद्धी,
बॉलिवूडचा ‘किंग खान’, अर्थात शाहरुख खान याचा ‘रईस’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शाहरुखने त्याला मिळालेली प्रसिद्धी, सुपरस्टारपद आणि त्याला चित्रपटांकडून असणाऱ्या अपेक्षा याविषयी आपली मते खुलेपणाने मांडली. ‘मला मिळालेले स्टारडम हे
अधिक काळ असणार नाही, हे माहिती आहे. स्टारडम हे अल्पकाळासाठी असते; मात्र त्याचा प्रत्येक क्षण मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला. त्याने माझे आयुष्य बदलले,’ असेही त्याने सांगितले. ‘सीएनएक्स मस्ती’च्या संपादक जान्हवी सामंत यांनी त्याचा घेतलेला हा एक्सक्लुजिव्ह इंटरव्ह्यू...
शाहरुख तुझे जगभरात फॅन आहेत. तू नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलतो. भारतीय चित्रपट विस्तारताना तू कसा पाहतोस?
मी भारतासाठीचा जागतिक वक्ता आहे. विशेषत: चित्रपटाच्या दृष्टीने. मी पत्रकार, वृतपत्रे, नियतकालिके, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधतो. माझे ध्येय भारतीय रचना, संस्कृती यांची माहिती देण्याविषयीचे असते. तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर देशासाठी कसा करता हे महत्त्वाचे आहे. आमचे चित्रपट जगभर जातात. परदेशातील लोक ते पाहतात, त्यांना आवडतातही. मला वाटते तीन गोष्टींवर विचार झाला पाहिजे. पहिला म्हणजे, आम्ही आमची भाषा बदलली पाहिजे. मी हे कथा आणि पटकथांसंदर्भात सांगतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निकष जवळपास ९९ टक्के तसेच असतात. त्यांचे चित्रपट दीड तासाचे असतात. संगीत खूप कमी असते. त्यांच्या कथा खूप सुंदर असतात. त्यांची व्यक्त करण्याची पद्धत अगदी छान असते. भारतामध्ये संगीत हे महत्त्वाचे आहे. रहमान की प्रीतम, पारंपरिक की मूळ असा विचार असतो. दुसरा म्हणजे, आमची जीवनशैली. आम्ही इंग्रजी पद्धतीने असायला हवी. ज्या पद्धतीचा पेहराव हवा तसाच वापरला पाहिजे. आम्ही जिन्स आणि टी-शर्ट घालू असे होत नाही. डिअर जिंदगी हा अशाच इंग्रजी स्टाईलचा चित्रपट होता. तिसरा म्हणजे तंत्रज्ञान. भारतात ‘चलता है’ पद्धत आता चालणार नाही. माझी, तुमची मुले आता आयर्न मॅनला ओळखतात. त्यांना आवाजाची गुणवत्ता माहितीय. व्हिज्युअल क्वॉलिटी अत्यंत वेगवान हवी. मी माझ्यासाठी, मुलीसाठी जर चित्रपट करणार असेन, तरी तिच्याकडे क्षमता आहे म्हणून नव्हे, तर तिने ते पाहिलेय म्हणूनच मला तो चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा करावा लागेल. मार्केट आता बदललेय. तुम्ही परदेशातून येऊन भारतात नायलॉनचे बनियन विकणार असील, तर ते खपणार नाही’.
तू अलीकडे तांत्रिकदृष्ट्या खूप बदललेला आहेस. हा युवकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे किंवा तुझी वैचारिक दृष्टी आणखी विस्तारलीय?
मी अशा पिढीतला आहे, ज्यांची विचारपद्धती वेगळी आहे. त्यामुळे आता मी युवकांसोबत अधिक काम करतो. मी इम्तियाढ अलीसोबत लव्ह स्टोरी केली. ती यापूर्वी केलेल्या लव्ह स्टोरीज्पेक्षा वेगळी होती. आताचे युवक नव्या पद्धतीने विचार करतात. आदित्य चोप्राची विचार करण्याची पद्धत ही मेहबूब साहब किंवा यश चोप्रा यांच्यापेक्षा वेगळी आहे. मी गौरी शिंदे, राहुल ढोलकिया अशांसोबत काम करतो. भाषा बदलली आहे. मी रईसमध्ये एक डॉयलॉग म्हणतो, ‘बनियाभाई का दिमाग, बनियाभाई की डेअरिंग’ तो त्याच पद्धतीने म्हणणे आवश्यक होते. मी विविध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम करू इच्छितो.
राहुल ढोलकियासोबतचा तुझा अनुभव कसा होता?
राहुलने या चित्रपटाची कथा लिहिलीय. तो खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतो. शिमित अमीनची विचार करण्याची पद्धतदेखील वेगळी आहे. मी लोकप्रिय कलाकार आहे. राहुलचे विचार स्पष्ट होते. मला वेगळ्या धाटणीच्या कथेत काम करायचे होते, म्हणून मी या चित्रपटात काम करतो आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही याचा क्लायमॅक्स शूट केला. रात्री २.३० वाजता. त्याने तो खूप चांगल्या पद्धतीने झाल्याचे सांगितले. एकंदरच राहुलसोबतचा काम करण्याचा अनुभव धमाकेदार होता.
तू वेगळ्या पद्धतीचे स्टारडम अनुभवले आहेस. नव्या पिढीसाठी तू एक केस स्टडी आहेस. नव्या पिढीबाबत तू काय विचार करतोस?
मी अनेक वर्षांपासून काम करतोय. माझ्या स्टारडमचे निकष वेगळे आहेत. अमिताभ बच्चन, मायकेल जॅक्सन, मॅडोना. मी माझ्या पद्धतीने स्टारडम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:चे स्टारडम तयार केले. मी इतरांप्रमाणे का वागू? तुम्ही एकमेवाद्वितीय व्हावे. मी पोस्टरबॉय नव्हतो किंवा माझा रोमँटिक चित्रपट हिरोचा चेहराही नव्हता. माझी पार्श्वभूमीही चित्रपटाची नव्हती. तरीही मी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतात, तुम्ही जाहिराती अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी प्रसिद्धीत राहाल. मला चित्रपटापासून पैसे मिळतात, मला अशा माध्यमांची आवश्यकता वाटत नाही. स्टारडम हे काही काळासाठी असते. मला खूप पुरस्कार मिळाले, पैसा मिळाला आणि चित्रपटही मिळाले. आणखी काय हवे? एका चित्रपटानंतर दुसरा चित्रपट हिट होतो, हे सतत घडणार आहे. त्याची कोणतीही मर्यादा नाही. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर जरी तो बाजूला झाला असला तरी त्याने काय दिले आहे, हे महत्त्वाचे आहे. माझ्या स्टारडमविषयी कोणतीही तक्रार नाही. मी ते आनंदाने उपभोगतो आहे. बऱ्याच वेळा मी लोकांवर रागावलो, त्यांना बोललो. आता मी बऱ्यापैकी संयमी झालो आहे.