हा माझा कमबॅक नाहीये
By Admin | Published: August 12, 2016 02:08 AM2016-08-12T02:08:01+5:302016-08-12T02:08:01+5:30
बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश भारद्वाज आज इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे
बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश भारद्वाज आज इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. नितीश मोहेंजो दारो या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनी पुन्हा चित्रपटाकडे वळत आहे. नितीशसोबत त्याच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या गप्पा...
महाभारत या मालिकेनंतर तू काही मराठी चित्रपट केलेस, तसेच काही वर्षांपूर्वी पितृऋण या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. एक प्रसिद्ध चेहरा असूनही तू गेल्या काही वर्षांत लाइमलाइटपासून दूर आहेस याचे कारण काय?
- मी अभिनयापासून दूर गेलो होतो असे कधीच म्हणणार नाही. मी नाटकात काम करत होतो. माझ्या एका नाटकाचे तर लंडनमध्ये अनेक प्रयोग झालेले आहेत. हे नाटक अनेक फेस्टिव्हलमध्येदेखील गाजलेले आहे. तसेच दरम्यानच्या काळात मी मानसरोवर यात्रेवर एक पुस्तक लिहिले. माझ्या या पुस्तकात अतिशय सुंदर फोटोदेखील आहेत. ते फोटोदेखील मीच काढलेले आहेत. तसेच मी चक्रव्यूह हे नाटक करत होतो. या सगळ्यामुळे मी खूपच व्यग्र होतो. मला उगाचच मीडियात राहायला किंवा पब्लिसिटी मिळवायला आवडत नाही.
अनेक वर्षांनंतर चित्रपटात काम करण्याचा विचार कसा केला?
- मी माझ्या एका कामसाठी पुण्यात होतो. त्या वेळी आशूचा (आशुतोष गोवारीकर) फोन आला. आशू एक चित्रपट बनवत असून, त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो भूजमध्ये आहे याची मला कल्पना होती. त्याने मला फोनवरच सांगितले की, या चित्रपटात एक खूप महत्त्वाची भूमिका आहे, तू ती साकारावी अशी माझी इच्छा आहे. तुला मला कथा ऐकवायची आहे. तू लवकरात लवकर भूजला ये. माझे आणि आशूचे अनेक वर्षांपासून खूप चांगले नाते असल्याने मी लगेचच दुसऱ्या दिवशीच आशूला भेटायला भूजला गेलो. चित्रपटाची कथा आणि माझी भूमिका ऐकताचक्षणी ती मला खूप आवडली आणि लगेचच मी या चित्रपटासाठी होकार दिला. मी साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे.
मोहेंजोदडो या चित्रपटात तुझी भूमिका काय आहे?
मोहेंजोदडो या चित्रपटात मी दुर्जन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. दुर्जन हा हृतिकचा काका दाखवला आहे. हा एक शेतकरी आहे. त्याचा एक भूतकाळ असून त्याने तो सगळ्यांपासून लपवलेला आहे. पण त्याने तो भूतकाळ सांगितल्यावर खऱ्या अर्थाने चित्रपटाची कथा वेगळ्या उंचीवर जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील माझी भूमिका ही खूप महत्त्वाची आहे.
तू एक डॉक्टर असताना अभिनयाकडे कसा वळलास?
- मी प्राण्यांचा डॉक्टर असलो तरी मला केवळ घोड्यांमध्ये रस होता. त्यामुळे मी महालक्ष्मी रेसकोर्समध्ये एका डॉक्टरांसोबत कामही करत होतो. पण अचानक त्यांची बदली कोलकाताला झाली आणि माझी नोकरी गेली. रेसकोर्सला नोकरी करत असताना आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात मी एक वार्तापत्र वाचायचो. वार्तापत्र वाचायचा अनुभव असल्याने नोकरी गेल्यानंतर मी दूरदर्शनमध्ये न्यूजरीडर या पदासाठी आॅडिशन दिले. तिथून खऱ्या अर्थाने माझा कॅमेऱ्याशी संबंध आला. त्याआधी मी सुधा करमरकर यांच्या संस्थेत काही नाटके केली होती. मी अभिनेता, दिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या तिथे पार पाडल्या होत्या. त्यामुळे मला अभिनयाची आवड तेव्हापासूनच होती, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
पितृऋण या चित्रपटानंतर चित्रपटाची निर्मिती करण्याचा काही विचार आहे?
- माझ्या पितृऋण या पहिल्या चित्रपटाचे रसिकांनी आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. हृतिकनेदेखील हा चित्रपट पाहिल्यावर त्याला हा चित्रपट आवडल्याचे मला सांगितले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर सध्या मी माझ्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. मी लवकरच चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.