‘कपडे काढून कॅमेऱ्यापुढे येणे केवळ इतकीच ‘बोल्ड’ची व्याख्या नाही’
By Admin | Published: February 20, 2017 05:07 AM2017-02-20T05:07:02+5:302017-02-20T05:07:02+5:30
‘चश्मेबद्दूर’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री तापसी पन्नू आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ‘पिंक’ चित्रपटाने
- Rupali Mudholkar -
‘चश्मेबद्दूर’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री तापसी पन्नू आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ‘पिंक’ चित्रपटाने तापसीला खरी ओळख मिळवून दिली. तापसीचा ‘रनिंग शादी’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. ‘दी गाझी अटॅक’ या चित्रपटातही ती दिसली. लवकरच तापसी ‘नाम शबाना’ या चित्रपटात झळकणार आहे. या निमित्ताने तापसीसोबत मारलेल्या गप्पांचा हा सारांश...
प्रश्न - तापसी, ‘पिंक’ नंतर तू ‘रनिंग शादी’ हा चित्रपट स्वीकारलास, यातील तुझी भूमिका कुठल्या अर्थाने अनोखी आहे?
तापसी : ‘पिंक’ नंतर ‘रनिंग शादी’ स्वीकारण्यामागे एकच कारण होते, ते म्हणजे, यातील माझे कॅरेक्टर. मी रिअल लाइफमध्ये जशी आहे, अगदी तशीच ही भूमिका होती. ही भूमिका चालून आली आणि मी ती स्वीकारली. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या ‘मला’ कॅमेऱ्यासमोर येण्याची संधी मिळाली. यात मी एका अमृतसरच्या पंजाबी मुलीची भूमिका साकारतेय. तशी तर मी पंजाबची नाही तर दिल्लीची आहे. पंजाबची ही मुलगी काहीही करण्याआधी जराही विचार करत नाही. अगदी निष्पाप, आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी मुलगी मी यात रंगवलीय.
प्रश्न : कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या आणि कम्फर्ट झोनच्या आतील भूमिका यात तुझ्या मते काय फरक आहे?
तापसी : ‘रनिंग शादी’मधील माझी भूमिका अगदी माझ्या कम्फर्ट झोनच्या आतील भूमिका होती. या कॅरेक्टरमध्ये मी अगदी अलगद शिरले. यासाठी मला कुठलीही तयारी करावी लागली नाही. मी जशी आहे, तशी कॅमेऱ्यासमोर गेले. या उलट कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या भूमिकांसाठी तुम्हाला वेगवेगळ्याप्रकारची तयारी करावी लागते. अशा भूमिका करताना प्रत्येक अभिनेता आपापल्या परिने तयारी करत असतो.
प्रश्न : ‘पिंक’च्या यशानंतर तुझ्या आयुष्यात खास असे काही बदल झालेत का?
तापसी : एक चित्रपट हिट झाला की, लोकांना तुमच्यामध्ये वेगळा इंटरेस्ट निर्माण होतो, हा तर बॉलिवूडचा अलिखित नियम आहे. त्याअर्थाने काही बदल जाणवलेतही. पण, खरे सांगायचे तर माझ्या आयुष्यात कुठलाही ठळक असा बदल झालेला मला जाणवला नाही. कारण, माझ्यासाठी यश आणि अपयश फार नवी गोष्ट नाही. मी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत या दोन्हीची चव चाखली आहे. अर्थात, ‘पिंक’ या चित्रपटाने मला एक समाधान मात्र नक्की दिले. यातील माझी भूमिका लोकांना प्रचंड आवडली. हे कॅरेक्टर घराघरात पोहोचले. या चित्रपटाने दिलेला संदेश घराघरात पोहोचला. याचे मला समाधान आणि आनंद दोन्हीही आहेत.
प्रश्न : ‘पिंक’सारखा एक मोठा सामाजिक संदेश देणारा चित्रपट केल्यानंतर एखादा ‘बोल्ड’ चित्रपट स्वीकारायचा झाल्यास तुला काही मर्यादा जाणवतात का?
तापसी : अजिबात नाही. कारण माझ्या मते, ‘पिंक’ हा चित्रपट अतिशय बोल्ड चित्रपट होता. यातील कॅरेक्टर ‘बोल्ड’च्या रांगेत मोडणारेच आहे. कपडे काढून कॅमेऱ्यासमोर उभे राहणे केवळ इतकीच ‘बोल्ड’ची व्याख्या नाही. प्रत्येक चित्रपटात स्वत:ची वर्जिनिटी डिस्कस करणे म्हणजे ‘बोल्ड’पणा नाही. एक ‘बोल्ड’ संदेश कॅमेऱ्यापुढे देणे माझ्यामते, ती खरी ‘बोल्ड’ भूमिका. ‘पिंक’ या अर्थाने ‘बोल्ड’ सिनेमा होता. असे सिनेमे आणि अशा भूमिका मी पुढेही करणार.
प्रश्न : तुझ्या ‘नाम शबाना’ या आगामी चित्रपटाचीही बरीच चर्चा होतेय. याबद्दल काय सांगशील?
तापसी : चर्चा होणे हा आनंदाचा भाग आहे. लोकांना मला वेगवेगळ्या शेड्समध्ये पाहायचे आहे, याचा मुळात मला आनंद आहे. वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी वाट्याला येणे, यापेक्षा चांगली गोष्ट कुठल्याही कलाकारासाठी असूच शकत नाही. माझ्या वाट्याला अशा वेगवेगळ्या धाटणीच्या भूूमिका येत आहेत, याचा मला आनंद आहे. ‘नाम शबाना’त मी अनेक अॅक्शनदृश्ये करताना दिसणार आहे. प्रेक्षकांसाठी हे एक मोठे सरप्राइज असणार आहे.
प्रश्न : कुठलेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना या इंडस्ट्रीत टिकणे, किती कठीण आहे?
तापसी : माझ्यामते, इंडस्ट्रीत डेब्यू करणे फारसे कठीण नाही. तर टिकून राहणे कठीण आहे. सध्या इंडस्ट्रीत नव्या टॅलेंटला संधी दिली जात आहे. त्यामुळे ब्रेक मिळवणे तुलनेने सोपे आहे. पण, यानंतर या स्पर्धेत टिकणे कठीण आहे. फिल्मी ब्रॅकग्राऊंड नसेल तर तुम्हाला प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध करणे भाग आहे. दोन चार सिनेमांपैकी एक जरी हिट झाला तर तरलात. पण फ्लॉप झालेत तर तुम्ही बाजूला पडणार हे नक्की. त्यामुळे तुम्हाला सतत तुमचे यश सिद्ध करावे लागणार. फिल्मी बॅकग्राऊंड नसण्याचा हा एक तोटा आहे. अर्थात तोटा आहे तसाच एक मोठा फायदाही आहे. आऊटसाइडरवर कुठल्याही अपेक्षांचे ओझे तुमच्या डोक्यावर नसते. त्यामुळे थोडी जरी लोकप्रियता मिळवता आली तर पुढचा मार्ग एकदम सोपा होऊन जातो.
प्रश्न : तापसी, तू अभिनेत्री नसती तर काय झाली असती?
तापसी : अभिनेत्री नसते तर मी खूप काही झाले असते. मला फाइटर पायलट बनायचे होते, मला इंजिनिअर बनायचे होते. माझ्याकडे खूप सारे पर्याय होते. पण खरे सांगते, यात कुठेही हिरोईन बनण्याचा पर्याय नव्हता. पण तरीही मी हिरोईन बनले.
प्रश्न : तुझा ड्रिम रोल काय?
तापसी : माझा कुठलाही ड्रिम रोल नाही. मला केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे. तापसी या चित्रपटात आहे म्हणजे हा चित्रपट पाहण्यासारखा आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. माझ्यासाठी तेच ड्रिम रोल साकारण्यासारखे असेल.