Flashback : शोषणाला कंटाळून ‘या’ बोल्ड अभिनेत्रीने सोडले होते बॉलिवूड, आज ओळखणेही झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 08:00 AM2019-10-13T08:00:00+5:302019-10-13T08:00:02+5:30
अतिशय बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाई. पण आज तुम्ही या बोल्ड अभिनेत्रीला बघाल तर ओळखू शकणार नाही.
‘जुम्मा... चुम्मा दे दे’ हे गीत आठवत असेल तर या थिरकणारी अभिनेत्री तुम्हाला हमखास आठवणार. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री किमी काटकर हिच्याबद्दल. ‘हम’ चित्रपटातील ‘जुम्मा... चुम्मा दे दे’ हे गाणे किमीवर चित्रीत केले गेले होते. 1991 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर किमी मोजून तीन-चार चित्रपटांत दिसली आणि नंतर अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.
किमीचे फिल्मी करिअर फार मोठे नव्हतेच. पण तिने जे काही चित्रपट केलेत, ते सर्व तिच्या बोल्डनेसमुळे गाजलेत. त्याकाळातील अतिशय बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाई. पण आज तुम्ही या बोल्ड अभिनेत्रीला बघाल तर ओळखू शकणार नाही.
वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणा-या किमीला 1985 मध्ये पहिला ब्रेक मिळाला. ‘पत्थर दिल’ या चित्रपटात तिची वर्णी लागली. पण हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर ‘टार्जन’ नावाचा तिचा दुसरा सिनेमा आला. या सिनेमात किमीने दिलेली बोल्ड दृश्ये आजही लोकांच्या स्मरणात आहे. या सिनेमातील हॉट सीन्समुळेच तिची बोल्ड अभिनेत्री अशी इमेज तयार झाली होती.
वर्दी, दरिया दिल, मर्द की जुबां, मेरा दिल, गैर कानूनी, शेरदिल, जुल्म की हुकुमत असे अनेक चित्रपट तिने केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘जुम्मा... चुम्मा दे दे’ या गाण्याने. या गाण्यामुळे किमीचे करिअर वेगळ्या उंचीवर गेले. पण अचानक किमीने अनेक ऑफर्स नाकारणे सुरु केले. यश चोप्रासारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबतही तिने काम करण्यास नकार दिला.
याचदरम्यान तिने प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनुसोबत लग्न केले. यानंतर ती चित्रपटापासून कायमची दुरावली आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. अनेक वर्षांनंतर ती भारतात परतली. सध्या ती पुण्यात आपल्या पती व मुलासोबत राहते आहे.
इंडस्ट्रीतील शोषणाला कंटाळून बॉलिवूड सोडल्याचे किमीने यानंतर एका मुलाखतीत म्हटले होते. ‘मी इंडस्ट्रीला कंटाळून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मी अॅक्टिंगला अक्षरश: वैतागले. या इंडस्ट्रीत हिरोईनपेक्षा हिरोला महत्त्व दिले जाते, हे मला सहन होत नाही,’ असे ती म्हणाली होती.