आता, आणखी एका चित्रपटावरुन वाद; आसाराम बापू ट्रस्टची निर्मात्याला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 01:11 PM2023-05-10T13:11:20+5:302023-05-10T13:31:40+5:30
मनोज वाजपेयी यांचा आगामी ''सिर्फ एक बंद काफी है'' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे
सध्या द केरल स्टोरी चित्रपटावरुन देशभरात वादंग सुरू आहे. धार्मिक वाद आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याने या चित्रपटाला समर्थन आणि विरोध होत आहे. भाजपकडून या चित्रपटाचं जोरदार समर्थन करण्यात येत असून अनेक ठिकाणी मोफत स्क्रिनिंगही सुरू आहे. एकीकडे या चित्रपटाचा वाद सुरू असतानाच आता अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या चित्रपटावरही वाद निर्माण झाला आहे. आसाराम बापू ट्रस्टने या चित्रपटाच्या निर्मात्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मनोज वाजपेयी यांचा आगामी ''सिर्फ एक बंद काफी है'' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ८ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट निर्मात्याला आसाराम बापू ट्रस्टने नोटीस पाठवली आहे. ट्रस्टच्या वकिलांनी कोर्टाकडे, ह्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. आसाराम बापूंच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवण्याचं काम हा चित्रपट करत आहे, असे वकिलाने म्हटले आहे.
या चित्रपटात एका बाबाने १६ वर्षीय मुलीवर रेप केल्याचं दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या डिस्क्लेमरमध्येही स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. तर चित्रपटात दिसणाऱ्या बाबाची वेशभूषा ही आसाराम बापू यांच्याशी मिळतीजुळती आहे. त्यावरुन, हा चित्रपट आसाराम यांच्या वादाशी निगडीत असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे निर्माते आसिफ शेख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पीसी सोलंकी यांच्यावर बायोपिक बनवला आहे, त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून सर्व हक्कही खरेदी केले आहेत. आम्हाला नोटीस मिळाली हे खरं आहे. या नोटीसला उत्तर आता आमचे वकीलच देतील. मात्र, आमच्याकडे चित्रपटासाठीचे राईट्स आहेत, कुणी काहीही म्हणो, असे शेख यांनी म्हटलंय. २३ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.