रमेश देव यांना मृत्यूची चाहूल लागली होती?; अजिंक्य देव यांनी सांगितली हृद्य आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:57 AM2022-02-04T08:57:22+5:302022-02-04T09:01:28+5:30

बाबांचे जगण्यावर होते प्रचंड प्रेम... आठवणी सांगताना अजिंक्य देव भावुक

now im going to die ramesh deo told his son ajinkya deo in hospital | रमेश देव यांना मृत्यूची चाहूल लागली होती?; अजिंक्य देव यांनी सांगितली हृद्य आठवण

रमेश देव यांना मृत्यूची चाहूल लागली होती?; अजिंक्य देव यांनी सांगितली हृद्य आठवण

googlenewsNext

मुंबई : ‘बाबांचे जगण्यावर प्रचंड प्रेम होते. आयुष्याकडे ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत. या स्वभावामुळे ते अनेकदा मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. याहीवेळी ते मृत्यूवर मात करतील असा विश्वास होता; पण नियतीने साथ दिली नाही’, अशा शब्दांत अजिंक्य देव यांनी रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते काहीसे भावुक झाले.

अजिंक्य देव म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बाबांना खोकला, कफ झाला होता. बुधवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सायंकाळपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांची प्रकृती ठीक असल्याने डॉक्टरांशी बोलून त्यांना गुरुवारी विशेष विभागात स्थलांतरित करायचे ठरवले. हे त्यांना सांगितल्यावर ते आनंदी झाले.  बराच वेळ त्यांनी माझ्याशी व अभिनयशी गप्पा मारल्या. आम्हा दोघांनाही आपल्या डोक्यावरून हात फिरवायला सांगितला. आम्ही डोक्यावरून हात फिरवताच त्यांनी सुखाचा उसासा घेतला. त्यामुळे काही अघटित घडेल, असे ध्यानीमनी नव्हते.  

१०० वर्षांचा होईन आणि...
अजिंक्य यांनी पुढे सांगितले की, ३० जानेवारीला बाबांचा ९३वा वाढदिवस झाला. त्यानंतर ते एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे त्यांनी सगळ्यांना सांगितले की, मी जेव्हा १०० वर्षांचा होईन, तेव्हा पुन्हा इथे येईन. ही त्यांची जिद्द, आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मकता, ऊर्जा, प्रेरणादायी होती. दुर्दैवाने त्यांची १०० वर्षे जगण्याची इच्छा अपुरीच राहिली.

त्यांना शेवट कळला होता?
अजिंक्य यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते माझ्याशी हसत हसत म्हणाले, अजिंक्य तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलास. मला खूप आनंद झाला. कारण मी आता जाणार आहे. त्यांचे हे बोल ऐकून आमच्या मनात चर्र झाले.
आम्ही त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही असे काही बोलू नका, असा विचार करू नका. तुम्हाला आमच्यासाठी जगायचे आहे. त्यावर ते म्हणाले, ‘अरे आयुष्यभर मी सगळ्यांचे सगळे केले, यापुढे माझ्यासाठी करायचे आहे’. अखेर त्यांचे हे बोल खरे ठरले.

Web Title: now im going to die ramesh deo told his son ajinkya deo in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.