N.T. Ramarao Biopic: कोण आहेत एनटीआर?, जाणून घ्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:02 PM2019-01-09T12:02:40+5:302019-01-09T12:08:55+5:30
एनटीआर यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले आहे. सिनेसृष्टीत एनटीआर यांना मोठं यश लाभलं. यशस्वी सिनेकारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणातही चमक दाखवली.
चित्रपटसृष्टीत सध्या बायोपिकची धूम आहे. त्यातल्या त्यात राजकीय नेत्यांवरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील सिनेमांची चर्चा आहे. ठाकरे, द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर आणि पी.एम. नरेंद्र मोदी या सिनेमांची सध्या चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या हिंदी सिनेमांसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांच्या जीवनावरील बायोपिकची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या सिनेमाचा ट्रेलर रसिकांना भावला आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन आणि रकुल प्रीत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एनटीआर यांच्या जन्मगावातून या सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करण्यात आलीय. एन.टी.रामाराव हे दाक्षिणात्य सिनेमा आणि राजकारणातील मोठं नाव आहे.
एनटीआर यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले आहे. सिनेसृष्टीत एनटीआर यांना मोठं यश लाभलं. यशस्वी सिनेकारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणातही चमक दाखवली. एन.टी.आर यांनी 1949 साली तेलुगू सिनेमा मना देसम सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आपल्या सिनेकारकिर्दीत त्यांनी बहुतांशी धार्मिक आणि पौराणिक सिनेमांमध्ये काम केलं.
हिंदू देवतांच्या भूमिका त्यांनी साकारल्या. 1961 साली एनटीआर यांनी सीतारमा कल्याणा या सिनेमापासून दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू केली. यानंतर एनटीआर यांनी अनेक दर्जेदार सिनेमा दिग्दर्शित केले. सम्राट अशोक हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा सिनेमा होता. एनटीआर यांचं खासगी जीवनही तितकंच चर्चेत राहिलं. वयाच्या 20व्या वर्षी 1943 साली त्यांनी बसावा टाकाराम यांच्याशी पहिलं लग्न केलं. पहिल्या लग्नानंतर त्यांना 8 मुलं आणि 4 मुली झाल्या. त्यानंतर 1993 साली लक्ष्मीपार्वती यांच्यासह एनटीआर यांनी दुसरं लग्न केलं. 1982 साली एनटीआर यांनी तेलुगू देसम पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1983, 1985 आणि 1994 साली मुख्यमंत्रीपद भूषवलं. 18 जानेवारी 1996 रोजी एन.टी.रामाराव यांनी अखेरचा श्वास घेतला.