ध्यास वैविध्यपूर्ण भूमिकांचा..!

By Admin | Published: May 19, 2017 03:21 AM2017-05-19T03:21:25+5:302017-05-19T03:21:25+5:30

कोणतंही काम कम्फर्ट झोन सोडून केलं आणि मेहनत केली तर रिझल्ट चांगला मिळतो, असं मत अभिनेता हर्षद आतकरी यानं व्यक्त केलं आहे. हर्षद आतकरीची प्रमुख भूमिका

Observe the diverse role of ..! | ध्यास वैविध्यपूर्ण भूमिकांचा..!

ध्यास वैविध्यपूर्ण भूमिकांचा..!

googlenewsNext

- Suvarna Jain

कोणतंही काम कम्फर्ट झोन सोडून केलं आणि मेहनत केली तर रिझल्ट चांगला मिळतो, असं मत अभिनेता हर्षद आतकरी यानं व्यक्त केलं आहे. हर्षद आतकरीची प्रमुख भूमिका असलेली मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. याच निमित्तानं त्याच्याशी साधलेला हा संवाद-

मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
ही मालिका हॉस्पिटल बेस्ड ड्रामा आहे. समाजात घडलेल्या मेडिकल केसेस आणि घटनांवर या मालिकेतून भाष्य करण्यात आलं आहे. या आगामी मालिकेत डॉ. यशस्वी खानापूरकर ही भूमिका मी साकारतो आहे. परदेशात शिकून आलेला हा एक डॉक्टर असून त्याला भारतातलं नंबर एकचं हॉस्पिटल बांधायचे आहे. रुग्ण हा हॉस्पिटलमध्ये फक्त उपचारांसाठीच येतो, अशी त्याची विचारसरणी आहे. हा डॉक्टर थोडा खडूस असला तरी एज्युकेटेड आहे. या मालिकेची कथा समाजात घडलेल्या विविध घटनांवर आधारित असेल. त्यामुळे एकेक करून मालिकेतील गोष्टी उलगडत जातील. त्यामुळे ही मालिका एक वेगळा अनुभव देणारी असेल. ही मालिका खूप जास्त भागांची किंवा रटाळ होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

सध्या मालिकांचा मोठा गाजावाजा आणि प्रमोशन केलं जातं. तर प्रमोशन किंवा मार्के टिंग किती महत्त्वाचं आहे ?
सध्याच्या युगात आपल्या कामाचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या नव्या मालिकेच्या सुरुवातीपासूनच कलाकार त्या मालिकेच्या प्रमोशनमध्ये बिझी होतात. कारण सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे आणि प्रमोशनशिवाय गत्यंतरच नाही. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर प्रमोशन खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. सध्या सोशल मीडियामुळे होणाऱ्या गोष्टी पाहिल्या, तर त्याचा वापर वाढला आहे. प्रत्येक माध्यमाची एक जबाबदारी आहे. ते माध्यम तुम्ही कसं वापरता, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य आणि जबाबदारीनं वापर करणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.

सध्याचा रसिक चोखंदळ आहे असं तुला वाटतं का ?
आपल्याकडे दोन प्रकारचा रसिकवर्ग आहे. एक महिला वर्ग ज्याला सासू-सुनांचाही ड्रामा आवडतो आणि दुसरा रसिक वर्ग असा आहे ज्याला रोज नवीन-नवीन गोष्टी घडतात अशा मालिका बघायला आवडतात. त्यामुळे दोन्ही प्रकारचे रसिक महत्त्वाचे आहेत. मुळात जे रसिकांना आवडतं तेच दाखवलं जातं, हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे बदल होतायेत, ते होत राहतील आणि रसिकांना जे आवडेल, जे रुचेल, जे पटेल आणि जे भावेल तेच पाहतील.

मालिकेतील यशस्वी आणि रिअल लाइफमधला हर्ष यात किती साम्य आहे ? मालिकांसोबत नाटक वगैरे करणार का ?
वैयक्तिकरीत्या खोट्याची मला प्रचंड चीड आहे. खोट्या गोष्टी मला आवडत नाहीत. माझ्यातील काही गुण माझ्या भूमिकेशी मिळतेजुळते असतात. अशाच छटा मी माझ्या भूमिकेत शोधत असतो. सध्या मालिका करत असलो, तरी एखादं छानसं व्यावसायिक नाटक करण्याची इच्छा आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी बऱ्याच एकांकिका केल्यायत. आता एक व्यावसायिक नाटक करण्याची इच्छा आहे. त्याची वाट बघतोय.

आधुनिक जमान्यात मनोरंजनाची माध्यमं विस्तारत आहेत तर त्याबद्दल काय वाटतं? रसिकांना काय आवाहन करशील ?
मनोरंजनाची माध्यमही विस्तारत आहेत. सध्या वेबसिरीज हा एक प्रकार रूढ होतोय. वेबसिरीज हा मीडियाही मला भावतो. यात कोणतीही बंधनं नसतात. जे आपण मालिका- सिनेमात दाखवू शकत नाही, त्यावर वेबसिरीजच्या माध्यमातून भाष्य करू शकतो. कोणत्याही गोष्टींचं यांत बंधनं नसतं. तरुणाईपर्यंत पोहोचायचे असेल, तर वेबसिरीजही चांगला पर्याय आहे. आतापर्यंत रसिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे. यापुढेही करत राहा, अशी रसिकांना विनंती आहे.

Web Title: Observe the diverse role of ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.