अरेच्चा...! शाळेनंतर कॉलेजमध्ये कधीच गेला नाही टायगर श्रॉफ, खुद्द तुम्हीच जाणून घ्या याबद्दल
By तेजल गावडे | Published: April 28, 2019 06:00 AM2019-04-28T06:00:00+5:302019-04-28T06:00:00+5:30
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटाच्या सीक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटाच्या सीक्वलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटाबाबत तू किती उत्सुक आहेस?
- 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातील कलाकारांचेदेखील खूप कौतूक झाले होते. त्यामुळे आता या चित्रपटाच्या सीक्वेलला रसिक कसा रिस्पॉन्स देतात,हे पाहावे लागेल. त्यामुळे स्टुडंट ऑफ द ईयर २ बाबत मी खूप उत्सुक आणि नर्व्हसदेखील आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २' हे एक वेगळे जग आहे. पहिल्या भागात पाहिलेले कॉलेज तुम्हाला पहायला मिळणार आहे. कथानक, पात्र व स्पोर्ट्स वेगळे पहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल सांग?
-'स्टुडंट ऑफ द ईयर २' हा माझ्यासाठी 'बागी'सारखा चित्रपट अजिबातच नव्हता. ज्यासाठी पडद्यावर धडाकेबाज अॅक्शन करण्यासाठी भरपूर मेहनत किंवा सरावाची गरज होती. यात फक्त एक महत्त्वाचे होते की एका कॉलेज स्टुडंटप्रमाणे मला वागायचे आणि दिसायचे होते. माझ्या आतापर्यंतच्या अॅक्शन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट माझ्यासाठी विशेष आहे. पण विशेष बाब म्हणजे मी खऱ्या आयुष्यात कधी कॉलेजलाच गेलो नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे कॉलेज आणि एका सामान्य तरुणाचे आयुष्य जगण्याची एक संधी होती. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. पण, मला या चित्रपटामुळेच कॉलेज लाईफ कसे असते हे सेटवर समजले.
तू कॉलेजला का गेला नाहीस?
-शाळेनंतर लगेचच मला 'हिरोपंती' या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटातील भूमिकेची पूर्वतयारी करण्यासाठी जवळपास एक-दीड वर्ष गेले आणि त्यानंतर 'हिरोपंती'चे चित्रीकरण सुरू झाले. त्यामुळे माझे कॉलेज म्हणजे 'हिरोपंती'चा सेटच होता.
या चित्रपटात तू आलिया भटसोबत थिरकताना दिसणार आहेस, हा अनुभव कसा होता?
-खूप छान अनुभव होता. जेव्हा करण सरांनी आलिया भटसोबत गाणे करायचे असल्याचे मला सांगितले. त्यावेळी मी खूपच उत्सुक झालो. कारण मी तिचा चाहता आहे. परंतु तिच्यासोबत काम करणे खूप चॅलेंजिंग होते. कारण तिचा प्रत्येक शॉट परफेक्ट होता. त्यामुळे मलादेखील शंभर टक्के द्यावे लागला. तिच्यासोबतचे काम खूप छान झाले आहे.
बॉलिवूडमधील खानांचा जमाना आता गेला आहे. त्यांचे जे चाहते होते ते आता तुमचे चाहते आहे. याबद्दल तुला काय वाटते
-तुम्ही जे बोलत आहात, ती माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. मात्र याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही. कारण त्यांच्यामागे पंचवीस ते तीस वर्षांचे कठोर परिश्रम आहेत. मला आता इंडस्ट्रीत येऊन फक्त ४ वर्षे झाले आहेत. त्यामुळे अशा दिग्गज कलाकारांसोबत माझी मी तुलना करू शकत नाही.
तुझे वडील जॅकी श्रॉफ 'भारत' चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर तुला कसा वाटला?
- 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला. त्यातील मी माझ्या वडीलांचे डायलॉग ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा उभा रहिला. मला त्यांचा अभिमान वाटला की आजही त्यांच्या अभिनयात व आवाजात ती बात आहे. अप्रतिम ट्रेलर आहे. सलमान खानचा हा चित्रपट ब्लॉक बास्टर ठरेल,यात अजिबात शंका नाही. यातील त्याचे लूकही खूप चांगले आहेत.