OMG!! नेटफ्लिक्सची सीरिज ‘सेक्रेड गेम्स2’लाही #MeTooचा फटका??
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 07:33 PM2018-10-10T19:33:40+5:302018-10-10T19:37:08+5:30
होय, बॉलिवूडमध्ये जोर धरू लागलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे ‘सेक्रेड गेम्स2’चे काम खोळंबण्याचा धोका आहे.
अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्सची फर्स्ट ओरिजनल इंडियन सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. या पहिली सीरिज संपत नाही, तोच प्रेक्षक ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले होते. केवळ इतकेच नाही तर आम्हाला ‘सेक्रेड गेम्स2’ पाहिजे, अशी मागणी प्रेक्षकांनी लावून धरली होती. अलीकडे ‘सेक्रेड गेम्स2’चा टीजर रिलीज करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षक सुखावले होते. पण आता चाहत्यांच्या या आनंदावर विरजण घालणारी एक बातमी आहे. होय, बॉलिवूडमध्ये जोर धरू लागलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे ‘सेक्रेड गेम्स2’वर परिणाम होऊ शकतो. ‘मी टू’ चळवळीअंतर्गत वरूण ग्रोव्हरवर गैरवर्तनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. वरूण ग्रोव्हर हा ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजचा सहलेखक आहे. ताजी बातमी खरी मानाल तर वरूणवर गैरतर्वनाचा आरोप झाल्यानंतर नेटफ्लिक्स आता वरूणचा पर्याय शोधत आहे. नेटफ्लिक्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूण ग्रोव्हरवरच्या आरोपानंतर नेटफ्लिक्सने या स्थितीशी निपटण्यावर विचार चालवला आहे. याअंतर्गत सीरिजच्या श्रेय नामावलीतून त्याचे नाव वगळण्याचा विचार नेटफ्लिक्स करत आहे. कदाचित येत्या दिवसांत वरूण ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजमधून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यताही सूत्रांनी बोलून दाखवली आहे. अशास्थितीत योग्य पर्याय मिळाला नाहीच तर ‘सेक्रेड गेम्स’चे काम खोळंबण्याचा धोका आहे. येत्या दिवसांत यावर काय तोडगा निघते ते बघूच.
वरूण ग्रोव्हरवर त्याच्याच कॉलेजातील एका ज्युनिअर विद्यार्थीनीने गैरवर्तनाचा आरोप केला आहे. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात भूमिका देण्याच्या बहाण्याने वरूणने आपल्यासोबत गैरवर्तनाचा प्रयत्न केला होता, असा आरोप तिने केला आहे. दरम्यान वरूणने हे सगळे आरोप नाकारले आहेत. हे सगळे आरोप खोटे आहेत. मी लवकरचं यावर विस्तृत स्पष्टीकरण देईल, असे त्याने स्पष्ट केले आहे.