कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपात प्रवेश केलेले शेखर सुमन म्हणाले - "ती आता खासदार असल्याने.."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 09:14 AM2024-06-08T09:14:18+5:302024-06-08T09:14:38+5:30
शेखर सुमन यांनी कंगना रणौतवर झालेल्या हल्ल्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे (Kangana ranaut))
अभिनेत्री कंगना रणौतवर चंदीगढ एअरपोर्टवर हल्ला झाला. CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. हे प्रकरण चांगलंच तापलं. विविध स्तरांवरुन यावर प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रतिक्रिया कंगनाच्या समर्थनार्थ आहेत तर काही लोक झालेल्या हल्ल्याचं समर्थन करत आहेत. अशातच काहीच दिवसांपुर्वी भाजपात प्रवेश केलेले अभिनेते शेखर सुमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शेखर सुमन काय म्हणाले?
एका कार्यक्रमात गेलेल्या शेखर सुमन आणि त्यांचा लेक अध्ययन सुमन यांना या घटनेबद्दल विचारले असता शेखर म्हणाले की, "हे कोणाबाबतही झाले असले तरी हे पूर्णपणे चुकीचे आहे. कंगना आता मंडीतून खासदार आहे. कुणाला विरोध करायचाच असेल तर सभ्य पद्धत वापरली पाहिजे. अशा प्रकारची कृती अस्वीकार्य आहे. याबाबत अध्यायनला विचारले असता तो सुद्धा त्याच्या वडिलांशी पूर्णपणे सहमत असल्याचे दिसला.
सार्वजनिकपणे समस्या मांडणं चुकीचं
शेखर सुमन शेवटी म्हणाले, "वैयक्तिकरित्या कोणाची कितीही समस्या असली तरी ती सार्वजनिकपणे मांडणे योग्य नाही. अशी घटना पुन्हा होऊ नये." राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी या थप्पड मारण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली असून तिला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिच्यावर एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.