एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सिनेइंडस्ट्रीपासून दूर, आता त्यांना ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 03:51 PM2021-09-11T15:51:55+5:302021-09-11T15:52:29+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आज अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत.

Once upon a time, these famous actresses are far from the cine industry, now it is difficult to recognize them | एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सिनेइंडस्ट्रीपासून दूर, आता त्यांना ओळखणं झालंय कठीण

एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सिनेइंडस्ट्रीपासून दूर, आता त्यांना ओळखणं झालंय कठीण

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आज वृद्धापकाळामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. यात सुलोचना लाटकर, चित्रा नवाथे, रेखा कामत, संध्या शांताराम, वत्सला देशमुख, दया डोंगरे या ज्येष्ठ अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्री भलेही अभिनय करताना दिसत नसल्या तरी आजही त्यांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे.  


सुलोचना लाटकर-

चित्रपटसृष्टीचा दीर्घकाळ अनुभवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सुलोचना लाटकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील निरागस आई म्हणून त्या प्रचलित आहेत. नुकतेच ३० जुलै रोजी त्यांनी आपल्या वयाच्या ९४ व्या वर्षात पदार्पण केले होते. हिंदी मराठी अशा जवळपास ३०० चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे अनेक नामवंत कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. सासू वरचढ जावई, अंदर बाहर, मोलकरीण, मजबूर, कहाणी किस्मत की, साधी माणसं, सांगते ऐका, दिलं देके देखो , सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटात नायिकेच्या, सहाय्यक आणि आईच्या भूमिका साकारल्या. आज सिनेइंडस्ट्रीपासून त्या दूर असल्या तरी अनेक कलाकार त्यांच्या घरी त्यांना भेटायला जातात.

दया डोंगरे- 

दया डोंगरे मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. खाष्ट आणि कजाग सासूच्या भूमिका त्यांनी अनेक मराठी चित्रपटात साकारल्या आहेत. त्यांच्या आई यामुताई मोडक या हौशी नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. खट्याळ सासू नाठाळ सून, तुझी माझी जोडी जमली रे, लेकुरे उदंड झाली, उंबरठा, दौलत की जंग, नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात त्या पहायला मिळाल्या आहेत.  दया डोंगरे यांनी काही वर्षांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. त्यांना दोन विवाहित कन्या असून मोठी मुलगी संगीता ही मुंबईत त्यांच्या घराजवळ राहते तर धाकटी अमृता बंगळुरूत राहते. त्यांचे पती शरद डोंगरे यांचे २०१४ मध्ये आकस्मिक निधन झाले. 

वत्सला देशमुख- 


वत्सला देशमुख या संध्या शांताराम यांची थोरली बहीण आहे. दोघी बहिणी सुरुवातीला गाण्यांवर नृत्य सादर करत असत. इथूनच त्यांना नाटक आणि चित्रपटात अभिनयाची संधी मिळत गेली. झंजार, झुंज, लडकी सह्याद्री की, पिंजरा, विधिलिखित, नवरंग अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. दिवंगत अभिनेत्री रंजना ही त्यांची मुलगी आहे. वत्सला देशमुख या वयाच्या नव्वदीत पोहोचल्या आहेत. काही वर्षांपासून त्या त्यांची बहीण संध्या यांच्याकडे राहत असल्याचे वृत्त माध्यमातून सांगितले जात होते.

संध्या शांताराम- 


संध्या शांताराम यांचा मुख्य भूमिका असलेला पिंजरा हा मराठी चित्रपट खूपच गाजला होता. त्यातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी देखील आजही तितकीच लोकप्रिय असलेली पाहायला मिळतात. अमर भूपाळी, परछायी, स्त्री, नवरंग, लडकी सह्याद्री की, दो आखें बारा हाथ अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. येत्या २७ सप्टेंबर रोजी त्या ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अभिनयापासून दूर असलेल्या पाहायला मिळतात.

चित्रा नवाथे –


चित्रा नवाथे या पूर्वाश्रमीच्या कुसुम सुखटणकर होय. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत सुखटणकर कुटुंब राहत होते. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा चित्रा म्हणजे कुसुम यांचा लग्नापूर्वीचा परिवार. पन्नासच्या दशकात अनेक सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. नातेवाईक असूनही चित्रा नवाथे यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली होती. मुलूंडमधील वृद्धाश्रमात असल्याची माहिती एका वृत्त माध्यमातून व्हायरल झाली होती. चित्रा यांना स्मृतिभ्रंश झाला असल्याचे त्या वृत्तात सांगितले होते. चित्रा यांनी लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलवता धनी, टिंग्या, अगडबम, बोक्या सातबंडे अशा मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

रेखा कामत- 

रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींनी लाखाची गोष्ट या चित्रपटात एकत्रित काम केले होते. रेखा कामत या पूर्वाश्रमीच्या कुमुद सुखटणकर होय. चित्रपट लेखक ग रा कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता. खूप वर्षांपूर्वी त्यानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती.

Web Title: Once upon a time, these famous actresses are far from the cine industry, now it is difficult to recognize them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.