प्रसिद्धी मिळविण्याचा असाही एक मार्ग
By Admin | Published: May 9, 2016 01:54 AM2016-05-09T01:54:37+5:302016-05-09T01:54:37+5:30
हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील वादावर तोडगा केव्हा, कसा आणि कोठे निघेल हे कोणालाही माहीत नाही; पण या वादाचा फायदा घेऊन काही लोक स्वत:ची प्रसिद्धी करून घेत आहेत
लोकमत स्पेशल - अनुज अलंकार
हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील वादावर तोडगा केव्हा, कसा आणि कोठे निघेल हे कोणालाही माहीत नाही; पण या वादाचा फायदा घेऊन काही लोक स्वत:ची प्रसिद्धी करून घेत आहेत. या वादाच्या नावाखाली स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा मार्ग काही लोकांनी शोधून काढल्याचे दिसते.
शेखर सुमन याचा मुलगा अध्ययन आपल्या करिअरमध्ये फारकाही करू शकला नाही. एका बड्या पित्याचा मुलगा म्हणून त्याला संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या; पण त्याचे काहीही भले झाले नाही. पाहता पाहता फ्लॉप होणाऱ्या स्टारपुत्रांच्या यादीत त्याचे नाव जाऊन तो गायब झाला.
हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील वादाने अध्ययन याला प्रसिद्धिमाध्यमात येण्याची एक संधी मिळाली. त्याचा त्याने भरपूर फायदा उठविला. एकेकाळी तो कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याचमुळे हृतिक-कंगना वादात त्याची भूमिका होती.
कंगनाचा भूतपूर्व प्रियकर म्हणून त्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार होता; पण अध्ययन याचा चेहरा पाहता तो कंगनावर बरसण्याची एक संधी शोधत होता, असेच म्हणावे लागेल. या वादाच्या नावाखाली त्याने कंगनाविरुद्ध भडिमारच केला. या प्रकरणात हृतिक रोशनचा एक शुभचिंतक होण्यापेक्षा आपण माजी प्रेयसीच्या कसे विरोधात आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न अध्ययन याने केला. यात त्याने आदित्य पांचोलीलाही ओढले. अध्ययनपूर्वी कंगनाशी आदित्य पांचोलीचे नाव जोडले गेले होते. संबंध संपुष्टात आल्यानंतरही यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांनी ती बाब संयमाने, शालीनतेने पाळली आणि परस्परांची प्रतिष्ठाही कायम ठेवली.
कंगनाने इतके अत्याचार केले असतील तर जगासमोर ते मांडण्यासाठी आतापर्यंत अध्ययन कशाची प्रतीक्षा करीत होता? या प्रश्नाचे त्याच्याकडे उत्तर नाही. कंगनासाठी तो ‘काळ्या जादू’ची भाषा वापरतो. ते पाहता या २१व्या शतकात त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा प्रकाराने त्याने प्रसिद्धिमाध्यमातून काही दिवस जागा मिळविली हे खरे; पण त्यातून त्याला काहीही मिळणार नाही.