सात पुरस्कारांसह ‘ओपेनहायमर’चे ‘ऑस्कर’वर वर्चस्व; ‘गोल्डन ग्लोब’पाठोपाठ दबदबा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:21 AM2024-03-12T05:21:15+5:302024-03-12T05:21:20+5:30
ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा झाला.
लॉस एंजेलिस : दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपेनहायमर’ने ‘गोल्डन ग्लोब’पाठोपाठ ‘ऑस्कर’मध्येही आपला दबदबा कायम ठेवला. ‘ओपेनहायमर’ने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्याच्या पुरस्कारांसह सात पुरस्कार मिळवत यंदाच्या सोहळ्यावर वर्चस्व राखले.
सोमवारी ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा झाला. ‘ओपेनहायमर’चे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट मूळ संगीत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनाचे पुरस्कारही मिळाले. ‘पुअर थिंग्ज’ने चार ऑस्कर पुरस्कारांसह ‘ओपेनहायमर’ला टक्कर दिली.
नामांकनातही आघाडी
२०२४च्या ऑस्कर नामांकनांमध्ये ‘ओपेनहायमर’ सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. या चित्रपटाने एकूण १३ नामांकने मिळवली होती, तर ‘पुअर थिंग्ज’ने ११ नामांकने, ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ १० आणि ‘बार्बी’ आठ नामांकने मिळवली होती.
प्रमुख पुरस्कार विजेते
- सर्वोत्तम चित्रपट : ओपेनहायमर
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन - ओपेनहायमर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : सिलियन मर्फी - ओपेनहायमर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन - पुअर थिंग्ज
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : रॉबर्ट डाऊनी ज्युनियर - ओपेनहायमर
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : दा वाईने जॉय रँडॉल्फ - द हॉल्डोव्हर्स
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा : अमेरिकन फिक्शन
- सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : ॲनॉटॉमी ऑफ फॉल
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : ओपेनहायमर
- सर्वोत्तम निर्मिती संयोजन : पुअर थिंग्ज
- सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स : गॉडझिला मायनस वन
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : द झोन ऑफ इंटरेस्ट (ब्रिटन)
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म : द बॉय अँड द हेरॉन
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म : वॉर इज ओव्हर
- सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट : द लास्ट रिपेअर शॉप
- सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म : ट्वेंटी डेज इन मारियुपोल