Oscar 2023 : ऑस्करसाठी चित्रपटांची निवड कशी केली जाते? नॉमिनेट आणि शॉर्टलिस्टमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:42 PM2023-01-11T15:42:29+5:302023-01-11T15:43:12+5:30
Oscar 2023 Shortlisted: 9 भारतीय चित्रपट जगातील सर्वात मोठ्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाले आहेत.
Oscar 2023 Nominations vs Shortlisted: मंगळवार(10 जानेवारी) हा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एकूण 9 चित्रपट जगातील सर्वात मोठ्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2023 साठी निवडले गेले आहेत. यामध्ये 'RRR', 'द कश्मीर फाइल्स' आणि 'कंतारा' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण, या सर्व चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे की नाही, याबद्दल बहुतेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण तसं अजिबात झालेलं नाही. ऑस्करसाठी नॉमिनेशन आणि शॉर्टलिस्टमधील फरक जाणून घेऊ...
ऑस्कर नॉमिनेशन आणि शॉर्टलिस्टमध्ये काय फरक आहे?
अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने मंगळवारी ऑस्कर अवॉर्ड्स 2023 साठी 301 चित्रपटांची यादी तयार केली. या ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील 9 चित्रपटांची नावेही समाविष्ट आहेत. शॉर्टलिस्टमध्ये देश-विदेशातील अनेक चित्रपटांचा समावेश आहे. अशा स्थितीत या चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन मिळाल्याचं अनेकांचं मत आहे. पण ही अफवा पूर्णपणे चुकीची आहे, कारण ऑस्करचे अंतिम नामांकन 24 जानेवारीला जाहीर होणार आहे. ज्यामध्ये टॉप 5 चित्रपटांचा समावेश असेल.
या यादीत सामील झाल्यामुळे नामांकन प्रक्रियेसाठी निश्चित झाल्याची हमी मिळत नाही. त्यामुळे या चित्रपटांना ऑस्कर मिळेल, असे नाही. ऑस्करच्या काही निकषांवर आधारित, कोणताही चित्रपट शॉर्टलिस्टसाठी अर्ज करू शकतो. ऑस्करच्या अंतिम यादीसाठी प्रत्येक श्रेणीतून 5 चित्रपट निवडले जातात. जे चित्रपट या टॉप 5 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवतात त्यांनाच ऑस्करसाठी नामांकित म्हणतात. त्यानंतर ऑस्कर ज्युरी सदस्य त्यांना पाहतात आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया होते. यावेळचा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी होणार आहे.
हे भारतीय चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत
ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या 9 भारतीय चित्रपटांमध्ये दिग्गज दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'RRR', बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स', संजय लीला भन्साळीचा 'गंगूबाई काठियावाडी', रिषभ शेट्टीचा 'कंतारा', आर माधवनचा 'रॉकेट्री-द नंबी इफेक्ट', किचा सुदीपचा 'विक्रांत रोना', गुजराती 'चेलो शो', मराठी 'मी वसंतराव' आणि 'तुझ साथी काही ही' यांचा समावेश आहे.