Oscar 2024: 'या' OTT वर भारतीय पाहू शकतात पुरस्कार सोहळा; जाणून घ्या वेळ अन् तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:47 PM2024-03-09T12:47:17+5:302024-03-09T12:47:43+5:30
oscars-2024: कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र, भारतीय प्रेक्षकांना हा पुरस्कार घरबसल्या पाहता येणार आहे.
कलाविश्वातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर 2024 (Oscar 2024 ) हा पुरस्कार सोहळा यंदा १० मार्च रोजी संपन्न होणार आहे. कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. नुकतीच या पुरस्कारांच्या नॉमिनेशनची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला आहे. यामध्येच आता हा पुरस्कार सोहळा भारतात कधी, कुठे आणि कोणत्या वेळात पाहायला मिळणार याविषयी चर्चा रंगली आहे.
कधी पार पडणार ऑस्कर 2024?
१० मार्च (रविवार) रोजी रात्री या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना तो सोमवारी पहाटे पाहायला मिळेल. १० मार्च रोजी डॉल्बी थिएटर्समध्ये रेड कार्पेट सेरेमनी पार पडणार आहे. यावेळी विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यंदा जिमी किमेल ऑस्कर 2024 च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे.
भारतात कधी आणि कुठे पाहता येईल ऑस्कर?
यंदाचा ऑस्कर सोहळा १० मार्च २०२४ रोजी होणार आहे. अमेरिकेत संध्याकाळी ७ वाजल्यापासून पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन जिमी किमेल या समारंभाचे सूत्रसंचालन करणार आहेत. विशेष म्हणजे हा पुरस्कार सोहळा भारतीय प्रेक्षकांना सोमवारी (११ मार्च) सकाळी ५.३० वाजता पाहायला मिळणार आहेत. डिझ्नी प्लस हॉटस्टार ओटीटीवर या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर प्रेंजटर्सच्या लिस्टमध्ये निकोलस केज, अल पचीनो, जेंडाया, सॅम रॉकवेल, बॅड बनी, ड्वेन जॉनसन, क्रिस हेम्सवर्थ, जेनिफर लॉरेंस, एमिली ब्लंट, अरियाना ग्रांडे, टिम रॉबिन्स, स्टीवन स्पीलबर्ग यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.