प्रसिद्ध अभिनेत्रीचा ७० वर्षीय व्यक्तीने केला विनयभंग, सार्वजनिक ठिकाणी आला धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 09:12 AM2023-10-06T09:12:30+5:302023-10-06T10:04:05+5:30
तो माझ्या जवळ आला, हात मिळवला, अन....
ओटीटीवरील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा चोप्रा (Eisha Chopra) हिला नुकताच भयानक अनुभव आला. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावरुन गायब होती. आता याचं खरं कारण तिने पोस्ट करत सांगितलं आहे. अभिनेत्रीला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. गर्दीच्या ठिकाणी ७० वर्षांच्या एका व्यक्तीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तिला चांगलाच मानसिक धक्का बसला असून ती यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
अभिनेत्री ईशा चोप्राने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. ईशाने लिहिले, "१० दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी एका अनोळखी माणसाने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने चांगले कपडे घातले होते. शिक्षित वाटत होता. त्याचं वय जवळपास ७० वर्ष असेल. तो माझ्याजवळ आला आणि स्वत:ची ओळख सांगू लागला. त्याने शेक हँड करण्याचा अर्थ हा घेतला की मी त्याला माझ्याजवळ यायचं निमंत्रणच दिलं आहे. त्याने मला हवं तिथे हात लावला. मी या घटनेमुळे कित्येक दिवस धक्क्यात होते."
ती पुढे लिहिते,"हे सगळं इतकं पटापट झालं की मी फ्रीज झाले होते. मला काही कळलंच नाही. सगळं थांबल्यासारखं वाटलं, मी ब्लँक झाले. आणि तो व्यक्ती आरामात तिथून निघून गेला. माझ्यासोबतची मैत्रिणही शॉक झाली की नक्की काय घडलं.म्हणूनच मी सोशल मीडियावर नव्हते. मला झोप लागत नव्हती. मी शॉकमध्ये होते. या सगळ्यातून बाहेर आल्यावर मी हे लिहित आहे."
मी ७ वर्षांची असताना पहिल्यांदा विनयभंगासारख्या प्रकाराला सामोरी गेले होते. हा प्रकार सिनेमा हॉलमध्ये घडला होता. त्या माणसाचा चेहरा मला आजही लक्षात आहे." असंही ती म्हणाली.
ईशा चोप्राने अनेक ओटीटी सिरीजमध्ये काम केलं आहे. तिची 'व्हॉट द फोक्स' ही सिरीज खूप लोकप्रिय आहे. याशिवाय तिने नुकत्याच रिलीज झालेल्या 'मेड इन हेव्हन' सिरीजमध्येही भूमिका साकारली आहे.