भारत विरुद्ध इंडिया?; "ओटीटी मोठ्या पडद्यांवरील आनंदाची अनुभूती निर्माण करू शकत नाहीत"
By संदीप आडनाईक | Published: January 22, 2021 07:42 PM2021-01-22T19:42:35+5:302021-01-22T19:42:58+5:30
‘भारतामध्ये चित्रपटांचे भवितव्य’ या विषयावर संवाद, चित्रपट वितरक अक्षय राठी, सिद्धार्थ रॉय कपूर सहभागी
संदीप आडनाईक
पणजी : ओटीटी मोठ्या पडद्यांवरील आनंदाची अनुभूती निर्माण करू शकत नाहीत, असे मत अनेक चित्रपट वितरक आणि निर्मात्यांनी व्यक्त केले. भारतात चित्रपटांचे भवितव्यः संधी आणि आव्हाने’ या विषयावर गोवा येथे सुरु असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आज एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये ते बोलत होते. रॉय कपूर फिल्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीआयआय माध्यम आणि मनोरंजनविषयक राष्ट्रीय समितीचे सहअध्यक्ष असलेले चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
सर्व निर्मात्यांनी मोठा फायदा कमावत आपले चित्रपट ओटीटींना विकले आहेत, ओटीटींच्या आगमनामुळे सिंगल स्क्रीन आपले महत्त्व गमावून बसले आहेत, असे मत व्हायकॉम १८ स्टुडियोचे मुख्य परिचालन अधिकारी अजित अंधारे यांनी व्यक्त केले. झी स्टुडियोजचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल यांनी त्यांच्या मताला दुजोरा दिला. हा मंच दाखल झाल्यापासून ओटीटीवर मनोरंजनविषयक सामग्रीची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि ती देखील खूप मोठ्या फायद्याच्या परताव्याच्या बदल्यात होत आहे, विशेषतः कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण खूपच जास्त असल्याचे पटेल यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सीआयआयचे सहअध्यक्ष आणि यूएफओ मुव्हीजचे संयुक्त अध्यक्ष कपिल अग्रवाल यांनी सिंगल स्क्रीन वाचवणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे सांगितले. चित्रपट वितरक आणि प्रदर्शक अक्षय राठी यांनी देखील याबाबत सहमती व्यक्त केली. सिंगल स्क्रीनला वाचवणे गरजेचे आहे यात काही शंकाच नाही, असे ते म्हणाले. सध्या कोणत्याही चित्रपट प्रदर्शकाला उत्पन्न मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
निर्मात्यांसाठी ओटीटी सोयीचे
अलीकडच्या काळात ओटीटीवरील मनोरंजन सामग्रीत आणि दर्शकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीचे अंधारे यांनी विश्लेषण केले. ओटीटी मंचावर कथेची मांडणी करताना आपल्याला एका मोठ्या प्रबोधनाचा अनुभव येत आहे, असे ते म्हणाले. घरच्या घरी पाहता येण्याजोगी अधिकाधिक सामग्री ओटीटीवर उपलब्ध होऊ लागल्यामुळे सिंगल स्क्रीन्समधून मिळणाऱा महसूल कमी झाला आहे. ओटीटीच्या सदस्यांची संख्या सतत वाढू लागली आहे, असे त्यांनी सांगितले. निर्माते ओटीटींकडे इतके आकर्षित का होऊ लागले आहेत? निर्मात्यांना आणि वितरकांना ओटीटीवर कोणताही तोटा सहन करावा लागत नाही. ज्यांनी आपली मनोंरजन विषयक सामग्री ओटीटीवर विकली आहे त्यांना १० % पासून अगदी १०० % पर्यंत नफा मिळाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ओटीटीवर अपयशाच्या शिक्क्याची भीती नाही
ओटीटीवर प्रत्येक चित्रपट यशस्वी ठरत आहे जी बाब निर्मात्यांना भुरळ घालत आहे. कोणतीही स्पर्धा नाही किंवा चित्रपट पडल्याचा शिक्का बसत नाही, असे शारिक पटेल यांनी सांगितले. ‘ओटीटी मोठ्या पडद्याच्या वलयाशी बरोबरी करू शकत नाहीत’ चित्रपट निर्माते अक्षय राठी यांनी मात्र यावेळी या नव्या डिजिटल मंचामधील त्रुटी अधोरेखित केली. ओटीटी म्हणजे एक सोय आहे पण मनोरंजनाचा खरा अनुभव देऊ शकत नाही. मोठ्या पडद्यावर जो आनंद मिळतो त्या अनुभूतीची बरोबरी ओटीटी करू शकत नाहीत, ही बाब त्यांनी निदर्शनाला आणली.
सिंगल स्क्रीनला कसे वाचवणार?
यूएफओ मुव्हीजचे कपिल अग्रवाल यांनी या प्रश्नावर काही उपाय सुचवले. चित्रपटगृहांमध्ये योग्य प्रकारे ही सामग्री नेणे गरजेचे आहे, महसुलाच्या विभागणीच्या आधारे याची सुरुवात झाली पाहिजे. चित्रपट प्रदर्शन उद्योगाने देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि अधिक पारदर्शक झाले पाहिजे, असे अग्रवाल म्हणाले. योग्य दर्शकांसाठी योग्य प्रकारचे मनोरंजन उपलब्ध करण्यावर देखील त्यांनी भर दिला. सिंगल स्क्रीनना उर्जितावस्था देण्यासाठी योग्य मनोरंजन सामग्रीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत विरुद्ध इंडिया?
या सत्राचे मॉडरेटर सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सध्या निर्माण होणाऱ्या मनोरंजनाच्या स्वरुपाबाबत प्रश्न उपस्थित केला. हे स्वरुप ‘भारत’ असे न राहाता ‘इंडिया’ च्या दिशेने झुकू लागले आहे का, असे त्यांनी विचारले. त्यावर अंधारे यांनी सांगितले की ज्या काळात मल्टिप्लेक्स आणि ओटीटीवर जास्त लक्ष केंद्रित होत आहे त्या काळात सृजनशीलता असलेले लोक म्हणून आम्हाला ‘ भारत’ वर आधारित कथांपेक्षा ‘इंडिया’ वर आधारित कथांमध्ये जास्त रुची वाटू लागली आहे.