आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही - एआयबीने सोडले मौन
By Admin | Published: February 5, 2015 12:33 PM2015-02-05T12:33:32+5:302015-02-05T12:36:38+5:30
अश्लिल विनोद, शेरेबाजीमुळे वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोने पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केले असून 'आमचा शो पाहण्याची कोणावरही सक्ती करण्यात आली नव्हती' असे स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळे वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोने पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केले असून 'आमचा शो पाहण्याची कोणावरही सक्ती करण्यात आली नव्हती' असे स्पष्ट केले आहे. एआयबीच्या फेसबूक पेजवर एक निवेदन देण्यात आले असून एअर टाईम विकत घेऊन कोणत्याही टीव्ही चॅनेलवर आम्ही हा शो प्रसारित केलेला नाही. यू-टूयबवर प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये वयोमर्यादेची सूचनाही स्पष्टपणे दिली होती असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे एआयबीला विरोध असतानाही त्यांचे असंख्य समर्थक त्यांच्याबाजूने उबे राहिल्याबद्दल एआयबीने त्यांचे आभार मानले आहेत.
' कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी नवीन आणण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, हे आमच्या समर्थकांना माहीत आहे. एआयबी नॉकआऊटमध्येही आम्ही काहीतरी नवीन देण्याचा आणि सेलिब्रिटींना स्वत:वरच हसायला लावायचा प्रयत्न केला. कोणाचाही अपमान करण्याचा वा त्यांना दुखावण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता. कार्यक्रमातील उपस्थितांनीही त्यांच्यावरील विनोदांना दाद देत ती संध्याकाळ हसत हसत घालवली,' असे निवेदनात म्हटले आहे.
२० डिसेंबरला वरळीत झालेल्या या शोच्या ३ चित्रफीती यूटयूबवरून सर्वत्र प्रसारीत झाल्यानंतर ब्राम्हण सेवा संस्थानने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या शोमधून भारतीय संस्कृतीची, महिलांची विटंबना करण्यात आली आहे. तरूणांच्या मनावर या शोमुळे वाईट परिणाम होऊ शकतो, असे तिवारी तक्रारीत नमूद केले होते. तसेच अशाप्रकारचे बीभत्स कार्यक्रम जाहीररित्या करू पाहाणा-यांना चाप बसावा यासाठी कार्यक्रमात सहभागी झालेले करण जोहर, रणवीर सिंग , अर्जुन कपूर यांच्यासह यांच्यासह शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या शोमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालू असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेने दिला होता.त्यानंत एआयबीने हे व्हिडीओ काढून टाकले होते.
मात्र आज त्याबाबत स्पष्टीकरण देत त्यांनी आपले मौन सोडले.