घराबाहेरची गर्दी महान अभिनेता असल्याचे लक्षण नाही - नसीरुद्दीन शहा
By Admin | Published: August 10, 2016 11:54 AM2016-08-10T11:54:41+5:302016-08-10T12:15:48+5:30
एखाद्याच्या (अभिनेत्याच्या) घराबाहेर हजारो लोकांची गर्दी झाल्याने तो महान अभिनेता ठरत नाही, असे वक्तव्य करत नसीरूद्दीन शहा यांनी पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरलेले अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी पुन्हा एकदा या मुद्यावर वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ' एखाद्याच्या ( अभिनेत्याच्या) घराबाहेर हजारो लोकांची गर्दी झाल्याने तो महान अभिनेता ठरत नाही,' असे नसीर यांनी म्हटले आहे. तसेच ' राजेश खन्ना जिवंत असताना चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्यांचा किती आदर राखला होता' असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांना राजेश खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळबद्दल विचारले असता नसीर यांनी हे वक्तव्य केले. ' माझ्या नजरेत राजेश खन्ना हे साचेबद्ध, निकृष्ट अभिनेता होते' अशी टीका नसीर यांनी केली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्यावर तसेच राजेश खन्ना यांची मुलगी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेही सडेतोड उत्तर दिले होते. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी नसीर यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी दर्शवत त्यांच्यावर टीका केली होती. ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनीही नसीर यांच्या वक्तव्याचा निषेध करत राजेश खन्ना हे निर्विवादपणे स्टार असल्याचे म्हटले होते. ' मी राजेस खन्ना यांच्या बंगल्याबाहेर हजारोंची ( फॅन्स) गर्दी पाहिली होती. ते चित्रपटसृष्टीतील पहिले व शेवटचे सुपरस्टार होते' असे सलीम खान यांनी ट्विटरवर म्हटले होते.
आणखी वाचा :
त्याच पार्श्वभूमीवर बोलताना नसीर यांनी आपला मुद्दा पुन्हा मांडला. ' त्या काळात राज कपूर- देव आनंद - दिलीप कुमार या त्रयीच्या करीश्म्याचा काळ संपला होता. आणि इंडस्ट्रीला एका नव्या हिरोची, चेह-याची गरज होती आणि राजेश खन्ना त्यामध्ये फिट बसले. चित्रपटसृष्टीतील लोकांनीच त्यांना बनवले, मोठे (सुपरस्टार) केले, त्यांचा वापर केला आणि त्यांची उपयुक्तता संपल्यानंतर बाजूला सारले' असे नसीर यांनी म्हटले.
राजेश खन्नावर नुकत्याच केलेल्या टीकेबद्दलही नसीर यांनी स्पष्टीकरण दिले. ' माझ्या वक्तव्यानंतर अनेकांनी माझ्यावर यथेच्छ टीका केली. मात्र त्यापैकी कोणीही माझं म्हणणं खोडून काढू शकलं नाही. मी असे कसे बोलू शकतो, मृत व्यक्तीचा तरी आदर राखायला हवा होता असेही अनेकांनी मला सुनावले. मात्र राजेश खन्ना जिवंत होते, तेव्हा चित्रपटसृष्टीने त्यांचा आदर राखला होता का? लोकं म्हणतात की त्यांच्या घराबाहेर हजारो फॅन्सची गर्दी असायची, मात्र ते काही महान अभिनेता असल्याचे लक्षण आहे का? असेही त्यांनी विचारले.
दरम्यान आपण गेल्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे राजेश खन्ना यांचे कुटुंबीय दुखावले गेले , हे मी समजू शकतो, त्यामुळे मी त्यांची माफी मागितली, असे नसीर म्हणाले. मात्र त्यांच्याशिवाय मी इतर कोणीचीही माफी मागितलेली नाही तसेच मी माझे वक्तव्यही मागे घेतलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.