बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:23 PM2024-10-05T13:23:49+5:302024-10-05T13:24:39+5:30
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित प्रियंका चोप्रा निर्मित पाणी सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय (paani, adinath kothare)
सध्या आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या 'पाणी' चित्रपटाती उत्सुकता शिगेला आहे. महाराष्ट्रातील सत्य घटनेवर आधारीत 'पाणी'च्या टीझरला सर्वत्र कौतुक मिळाले असतानाच आता निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या तरुणाच्या संघर्षाची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर तितकाच हृदयस्पर्शी आहे यात शंका नाही.
'पाणी'च्या ट्रेलरमध्ये काय?
'पाणी' ही हनुमंत केंद्रे यांची कथा आहे. हनुमंत हे राज्यात 'जलदूत' म्हणून ओळखला जातात. आदिनाथ कोठारे त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आदिनाथनेच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. हनुमंत केंद्रे यांचे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनोखं कार्य या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्या गावातील अनेक कुटुंबे पाण्याच्या समस्येमुळे स्थलांतरित झाली असताना, या तरुणाने मागे राहून समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. ट्रेलरमध्ये गावात पाणी नसल्याने तरुणांचं लग्न होत नाहीय. आपल्या गावातील पाण्याच्या संकटाचा सामना करण्याच्या प्रयत्नात हनुमंत यशस्वी होतो का आणि तो लग्न करतो की नाही? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळतील.
'पाणी'ची स्टारकास्ट आणि रिलीज डेट
'पाणी'मध्ये आदिनाथसोबतच रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा हे या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते आहेत. १८ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.