Padmaavat : कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत या शहरात रिलीज होणार भन्साळींचा 'पद्मावत'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 06:03 PM2018-02-07T18:03:13+5:302018-02-07T18:03:44+5:30
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा प्रचंड वादानंतर अखेर 25 जानेवारीला देशभरात सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला. आतापर्यंत या सिनेमानं 400 कोटी रुपयांहून अधिक गल्ला कमावला आहे.
नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत'सिनेमा प्रचंड वादानंतर अखेर 25 जानेवारीला देशभरात सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला. आतापर्यंत या सिनेमानं 400 कोटी रुपयांहून अधिक गल्ला कमावला आहे. बॉक्सऑफिसवर 'पद्मावत'ची घोडदौड सुरू असली तरीही राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सिनेमा अद्यापपर्यंत रिलीज करण्यात आलेला नाही. मध्य प्रदेशात करणी सेनेसहीत अन्य संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होऊ शकला नव्हता. मात्र आता हा सिनेमा इंदुरमध्ये गुरुवारी ( 8 फेब्रुवारी ) रिलीज होणार आहे.
ज्या सिनेमागृहांमध्ये पद्मावत रिलीज करण्यात येणार आहे, त्या सिनेमागृहांना पोलिसांनी पूर्णतः संरक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. इंदुरचे पोलीस महानिरीक्षक हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितले की, गुरुवारी पद्मावत सिनेमा रिलीज होत आहे, या पार्श्वभूमीवर मालकांनी सिनेमागृहांना संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. त्याच्या मागणीनुसार सिनेमागृहांना सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे.
दरम्यान, पद्मावत सिनेमा देशासोबत परदेशातही प्रचंड कमाई करत आहे. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला पद्मावत सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकला. भन्साळींचा हा सिनेमा बॉक्सऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. 200 कोटी रुपयांचा बजेट असलेला पद्मावत सिनेमानं पहिल्या आठवड्यात 166.50 कोटी रुपयांची कमाई केली. दुस-या आठवड्यात 46 कोटी रुपये आणि 13 दिवसांत सिनेमानं आतापर्यंत 225.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.