'प्रेम रोग' ऋषी कपूरला पडला महागात?; पद्मिनी कोल्हापुरेंनी सगळ्यांसमोर लगावली अभिनेत्याच्या कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 10:52 AM2022-08-01T10:52:29+5:302022-08-01T10:53:09+5:30
Padmani kolhapure: १९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रोग' (prem rog) या चित्रपटात ऋषी कपूरने देव ही भूमिका साकारली होती. तर, पद्मिनीने मनोरमा या विधवेची भूमिका साकारली होती.
बॉलिवूडमधील प्रत्येक घटना, किस्सा प्रेक्षकांमध्ये चर्चेत येत असतो. यात एखाद्या चित्रपटाच्या सेटवरील जुने किस्से वा कलाकारांचे अनुभव ऐकायला प्रेक्षकांना विशेष आवडतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (padmani kolhapure) आणि ऋषी कपूर (rishi kapoor) यांचा असाच एक किस्सा चर्चिला जात आहे. एकेकाळी पद्मिनी यांनी ऋषी कपूर यांच्या तब्बल ८ वेळा कानशिला लगावली होती.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी ९० चा काळ तुफान गाजवला. बालकलाकार ते दिग्गज अभिनेत्री या प्रवासात त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं. इतकंच नाही तर अनेक सुपरहिट चित्रपटदेखील त्यांनी कलाविश्वाला दिले. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे प्रेम रोग. हा चित्रपट त्या काळी प्रचंड सुपरहिट झाला. मात्र, यासाठी ऋषी कपूर यांना चक्क पद्मिनी कोल्हापुरेच्या हातचा मार खावा लागला. एका मुलाखतीत पद्मिनी यांनी स्वत: याविषयीचा खुलासा केला.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रोग' (prem rog) या चित्रपटात ऋषी कपूरने देव ही भूमिका साकारली होती. तर, पद्मिनीने मनोरमा या विधवेची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातील एका सीनमध्ये पद्मिनी यांनी ऋषी कपूरच्या कानशिलात लगावायची होती. मात्र, ऋषी कपूरसारख्या दिग्गज कलाकारावर हात उचलणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्या वारंवार नकार देत होत्या. मात्र, हा सीन परफेक्ट करायचा असेल तर तुला मारावंच लागेल असं दिग्दर्शक आणि ऋषी कपूर यांचं म्हणणं होतं. परंतु, हा सीन परफेक्ट येण्यासाठी त्यांना जवळपास ७-८ वेळा ऋषी कपूरवर हात उचलावा लागला.
"या चित्रपटात एका सीनमध्ये मला ऋषी कपूर यांच्या कानशिलात लगावायची होती. पण, ऋषी कपूर यांच्या गालाजवळ हात गेल्यानंतर माझा हात आपोआप थांबतो हे मी शुटिंगच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. परंतु, दिग्दर्शक राज कपूर यांनी मला ऋषी यांच्या कानाखाली जोरदार मारायला सांगितली होती. हा सीन खरा वाटावा यासाठी त्यांनी मला खरोखर ऋषी यांना मारायला सांगितलं होतं. त्यावेळी चिंटूने (ऋषी कपूर) ही मला सांगितलं की तू बिंधास्त मला जोरात कानफटात मार", असं पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, पहिल्या टेकच्या वेळी मी वेगाने हात उचचला पण ऋषीच्या कानाजवळ जाताच माझा हात थांबला. हा टेक राज कपूर यांना पटला नाही. मग पुन्हा त्यांनी माझ्याकडून ७-८ वेळा हा सीन करुन घेतला. यावेळी कॅमेरा इश्शू, टेक्निकल इश्शू असे बरेच अडथळे आल्यामुळे ऋषीला जवळपास ८ वेळा माझ्या हातचा मार खावा लागला.
दरम्यान, या सीनसाठी ऋषी कपूर यांना भलेही पद्मिनीच्या हातचा मार खावा लागला असला तरीदेखील हा चित्रपट तुफान सुपरहिट झाला. या चित्रपटात शम्मी कपूर, नंदा, तनुजा, सुषमा सेठ, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, ओम प्रकाश, बिंदू हे कलाकार झळकले होते.