मोठ्या पडद्यावर दिसणार आमिर-सनीची जोडी; या प्रसिद्ध दिग्दर्शाकासोबत करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 08:20 PM2023-09-27T20:20:50+5:302023-09-27T20:21:58+5:30
सनी देओलचे 'गदर-2'मधून दमदार कमबॅक झाले आहे, तर आमिर खान एका हिट चित्रपटाच्या शोधात आहे.
'लाल सिंह चड्ढा'नंतर आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आमिरच्या हाती दोन प्रोजेक्ट आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे, यात सनी देओलदेखील असेल. डिसेंबर किंवा जानेवारी 2024 मध्ये हा चित्रपट फ्लोरवर जाऊ शकतो.
या चित्रपटाची अधिकृत घोषणा सनी देओलच्या 66 व्या वाढदिवसादिवशी (19 ऑक्टोबर) केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. आमिर आणि सनीच्या या चित्रपटाबद्दल सांगितले जात आहे की, हा चित्रपट अॅक्शन-ड्रामा असेल. रिपोर्टनुसार, आमिर खान, राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांची नुकतीच बैठक झाली आहे. यामध्ये शूटिंग टाइमलाइन आणि फायनान्सवर चर्चा करण्यात आली आहे.
संतोषीसोबत सनी-आमिरचं पुनर्मिलन
राजकुमार संतोषी यांनी यापूर्वी सनी देओलसोबत 'घातक' आणि 'घायल' सारखे चित्रपट केले आहेत. 1994 मध्ये संतोषीने आमिर खानसोबत 'अंदाज अपना अपना' हा चित्रपटही बनवला होता. आता अनेक वर्षांनंतर या दोन बॉलीवूड कलाकारांसोबत राजकुमार संतोषी पुन्हा काम करत आहेत.
आमिरचा 'चॅम्पियन्स'
रिपोर्टनुसार, आमिर खान 'चॅम्पियन्स' या स्पॅनिश चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. 'चॅम्पियन्स' चित्रपटाबाबत सांगण्यात आले की, हा चित्रपट सध्या कास्टिंगच्या टप्प्यात आहे. 20 जानेवारी 2024 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.