पाकिस्तानींना खुणावतेय बॉलीवूड
By Admin | Published: September 28, 2016 02:11 AM2016-09-28T02:11:23+5:302016-09-28T02:11:23+5:30
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलीवूडमध्ये रमलेल्या पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बॉलीवूडमधील पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या भूमीत परत
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलीवूडमध्ये रमलेल्या पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बॉलीवूडमधील पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या भूमीत परत पाठवा, या मागणीने तोंड वर काढले आहे. खरे तर या पूर्वीही अनेकदा ही मागणी करण्यात आली होती, पण त्यानंतरही अनेक नवनवे पाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमध्ये आले, रुळले आणि इथलेच झालेत. अनेक वादानंतरही पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमधून परत जायचे नाहीय. उलट अनेक पाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमध्ये येण्यास उत्सुक आहेत. बॉलीवूडमध्ये येण्यास उत्सुक असलेल्या अशाच काही कलाकारांविषयी...
अमिना शेख
अमिना शेख हे पाकिस्तानच्या मनोरंजन विश्वातील एक ओळखीचे नाव. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी अमिना बॉलीवूडमध्ये येण्यास अनेक वर्षांपासून उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अमिनाने जाहीरपणे ही इच्छा बोलून दाखविली होती. ‘जगभर मला ओळखले जावे, असे मला वाटते आणि यासाठी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करायला मला आवडेल. हे माध्यम मला एक नवी ओळख मिळवून देईल,’ असे अमिना म्हणाली होती.
सनम सईद
सनम सईद ही पाकिस्तानमधील केवळ अभिनेत्रीच नाही, तर एक प्रसिद्ध गायिका आणि मॉडेल आहे. २०१० मध्ये महरीन जब्बार यांच्या मालिकेद्वारे सनम अभिनय क्षेत्रात आली. ‘जिंदगी गुलजार है’ या रोमँटिक मालिकेतील सनमचा अभिनय भारतीय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. भारतात मोठा चाहतावर्ग असलेल्या सनमलाही बॉलीवूडचे वेध लागले आहेत.
सबा कमर
पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री सबा कमर हीसुद्धा बॉलीवूडमध्ये येण्यास उत्सुक आहे. किंबहुना, तिने त्या दिशेने एक पाऊलही पुढे टाकलेले आहे. इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात सबा दिसणार आहे. साकेत चौधरी दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वी लोकांसमोर आला होता.
डेन्यल जफर
पाकिस्तानी अभिनेता अली जफर अनेक बॉलीवूड चित्रपटात दिसला होता. केवळ एवढेच नाही, तर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने भारतीय प्रेक्षकांची मनेही जिंकलीत. आता त्याचा भाऊ डेन्यल जफर बॉलीवूडमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. मध्यंतरी यशराज बॅनरच्या चित्रपटातून डेन्यल बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार, अशी चर्चाही रंगली होती.
आदिल हुसैन
पाकिस्तानी अभिनेता, फोटोग्राफर आणि निर्माता अशी ओळख असलेल्या आदिल हुसैनलाही बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळण्याची प्रतीक्षा आहे. ‘पिया रे,’ ‘मेरा नसीब’ यातील भूमिकांसाठी आदिल ओळखला जातो.
- rupali.mudholkar@lokmat.com