"कंगनाने राजकारणात यायला नको होतं", 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:21 AM2024-05-31T11:21:24+5:302024-05-31T11:22:04+5:30
'पंचायत' फेम अभिनेत्याने कंगनाबद्दल मोठं विधान केलं आहे. तिने राजकारणात यायला नको होतं, असं अभिनेत्याने म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कंगनाने तिच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून कंगनाला भाजपाकडून तिकिट मिळालं होतं. कंगनाने राजकारणात एन्ट्री घेतल्यानंतर तिला ट्रोलही केलं गेलं. आता 'पंचायत' फेम अभिनेत्याने कंगनाबद्दल मोठं विधान केलं आहे. तिने राजकारणात यायला नको होतं, असं अभिनेत्याने म्हटलं आहे.
'पंचायत' या गाजलेल्या वेब सीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता फैसल मलिकने प्रल्हाद ही भूमिका साकारली आहे. टीव्ही ९ला दिलेल्या मुलाखतीत फैसल मलिकने कंगनाबाबत वक्तव्य केलं आहे. "कंगना एक चांगली व्यक्ती आहे. ती पहिला अशी नव्हती. आता तिच्याकडे पाहून असं वाटतं की ही वेगळीच व्यक्ती आहे. कलाकारांनी फक्त त्यांचं काम म्हणजे अभिनय केला पाहिजे. या बाकीच्या गोष्टींमध्ये कलाकारांनी पडू नये, असं मला वाटतं", असं फैसल मलिक म्हणाला.
पुढे त्याने कंगानाच्या अभिनयाचं आणि कामाचंही कौतुक केलं. तो म्हणाला, "अभिनयात तिला तोड नाही. ती उत्तम अभिनय करते. एवढ्या मेहनतीने कलाकार अभिनय शिकल्यानंतर त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मला वाटतं की कलाकारांनी राजकारणात येऊ नये. जर तुम्हाला समाजकारण करायचं आहे. तर तुम्ही ते असंही करू शकता. त्यासाठी संसदेत जायची गरज नाही". कंगना आणि फैसलने 'रिव्हॉलव्हर रानी'मध्ये एकत्र काम केलं आहे. या सिनेमाचे ते निर्माते होते.
दरम्यान, 'पंचायत' वेब सीरिजमधून गावागावातील राजकारणाची हलकीफुलकी कथा मांडण्यात आली होती. फुलेरा गावात सचिव म्हणून आलेला अभिषेक त्रिपाठी प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला होता. 'पंचायत'मध्ये अभिनेता जितेंद्र कुमारने अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली. तर रघूवीर यादव, नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दुसऱ्या सीझनमध्ये शेवटचा भाग प्रेक्षकांना रडवून गेला. आता 'पंचायत 3' मध्ये फुलेरा पंचायतीमध्ये नवीन सचिव कोण होणार, याची रंजक कहाणी बघायला मिळणार आहे. 'पंचायत ३' मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव यांच्यासह सुनिता राजवार, पंकज झा, सानविका, चंदन रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.