पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 03:16 PM2024-07-17T15:16:12+5:302024-07-17T15:16:48+5:30
'पंढरीची वारी' सिनेमाने दाखवला कठीण काळ, निर्मात्यांचं झालं १८ लाखांचं नुकसान
विठ्ठलाची भक्ती आणि वारीचं दर्शन घडवणारा 'पंढरीची वारी' सिनेमा प्रचंड गाजला. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील 'धरीला पंढरीचा चोर' हे आजही लोकप्रिय आहेत. आजही आषाढी एकादशीला हा सिनेमा आवर्जुन टीव्हीवर दाखवला जातो. बाळ धुरी, जयश्री गडकर, राजा गोसावी, अशोक सराफ अशी स्टारकास्ट असलेल्या हा सिनेमा मराठीतील गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे. पण, हा सिनेमा करताना मात्र दिग्दर्शक आणि निर्मात्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.
'पंढरीची वारी' सिनेमात आळंदी ते पंढरपूर असं वारीचं खरं शूटिंग करण्यात आलं आहे. तर पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात हा सिनेमा शूट केला गेलाय. 'पंढरीची वारी' सिनेमात अभिनेता बाळ धुरी मुख्य भूमिकेत आहेत. पण, सर्वात आधी ही भूमिका दिग्गज अभिनेते अरूण सरनाईक साकारणार होते. पण, सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पण, शो मस्ट गो ऑन...असं म्हणत सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं. कारण, आळंदी ते पंढरपूर असं वारीचं खरं शूटिंग करायचं होतं. त्यामुळे पुन्हा एक वर्ष यासाठी थांबावं लागणार होतं. त्यामुळेच मनावर दगड ठेवत शूटिंग सुरू झालं. त्यानंतर अरुण सरनाईक यांची भूमिका साकारण्यासाठी अनेक अभिनेत्यांना विचारणा झाली. शेवटी अभिनेता श्रीकांत मोघे यांनी होकार दिला. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांना ही भूमिका करणं शक्य झालं नाही. अखेर, बाळ धुरी यांनी ही भूमिका साकारली.
या सिनेमात जयश्री गडकर मुख्य भूमिकेत दिसतात. पण, त्यांच्याऐवजी रंजना देशमुख यांची निवड करण्यात आली होती. पण, सिनेमाचं ७० टक्के शूटिंग पूर्ण झाल्यावर रंजना यांचाही भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांनी आपले पाय गमावले. रंजना पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी निर्मात्यांनी तीन वर्ष वाट पाहिली. पण, शेवटी नाईलाजाने त्यांना जयश्री गडकर यांना घेऊन पुन्हा सिनेमा रिशूट करावा लागला.
अनेक अडचणी येऊन देखील सिनेमाचे निर्माते अण्णासाहेब घाटगे आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी हार मानली नव्हती. १८ लाखांचं नुकसान होऊनही अण्णासाहेबांनी पंढरीची वाट सोडली नव्हती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हा सिनेमा पू्र्ण झाला.