'पवार' Play शिवाय मॅच जिंकता येत नाही, सोनालीचं पवारफुल्ल ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:17 PM2019-11-23T20:17:32+5:302019-11-23T20:19:49+5:30
देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... असे म्हणत फडणवीस यांनी आपला शब्द खरा खरुन दाखवला.
देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी मी पुन्हा येईन... असे विधान केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत महाविकासआघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं होतं. तसेच, फडणवीसांना आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं गणित आखलं होतं. पण, अजित पवारांच्या फुटीरतावादी खेळीनं पवारांच गणित बिघडलंय. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर, राज्य आणि देशपातळीतून फडणवीसांचं अभिनंदन केलं जात आहे. अनेकजण आपलं राजकीय विश्लेषण करत आहेत. त्यामध्ये सिनेकलाकारही मागे नाहीत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ट्विट करत कुठल्याही खेळीचा विजय पवारांशिवाय होत नाही असे म्हटलंय. पवार play शिवाय जिंकता येत नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असो किंवा क्रिकेट विश्वचषक फायनल असो, असे सोनालीने म्हटलंय. मात्र, असे म्हणतानाही तिने अद्याप या राजकीय ड्राम्याचा The End झाला नसल्याचं म्हटलंयं. सोनालीच्या या ट्विटवरुन नेटीझन्सने तिला सुनावले आहे. तुमची प्रतिमा वेगळी आहे, राजकारणात आणून खराब करू नका, असं एका युजर्सने सोनालीला म्हटले आहे.
‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही....
— Sonalee (@meSonalee) November 23, 2019
असं दिसतंय...
क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय 🤔
पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?