फोबिया: उत्कृष्ट अभिनय आणि रोमांचक अनुभव
By Admin | Published: May 28, 2016 01:52 AM2016-05-28T01:52:01+5:302016-05-28T08:16:31+5:30
एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या घटनांबाबत भास होऊ शकतात का? या विषयावर विज्ञान क्षेत्रात नेहमीच चर्चा होत असते. यावर हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. बॉलीवूडमध्ये तसा हा प्रयोग
‘फोबिया’ - हिंदी चित्रपट
- अनुज अलंकार
एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या घटनांबाबत भास होऊ शकतात का? या विषयावर विज्ञान क्षेत्रात नेहमीच चर्चा होत असते. यावर हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. बॉलीवूडमध्ये तसा हा प्रयोग कमीच झाला आहे. दिग्दर्शक पवन कृपलानी यांनी याच विषयावर सायको थ्रिलर ‘फोबिया’ हा चित्रपट बनविला आहे.
हे कथानक आहे मुंबईत राहणाऱ्या महकचे (राधिका आपटे). एका घटनेनंतर ती घराच्या बाहेर निघणेच बंद करून टाकते. बाहेरच्या जगाबद्दल तिला भीती वाटू लागते. महकला एका नव्या घरात हलविले जाते. तिथे तिला अशा काही घटनांचा आभास होऊ लागतो ज्याबाबत वास्तव कोणालाच माहीत नाही. कथानकाच्या निर्णायक क्षणी आभास वाटणाऱ्या या घटनांचे सत्यही समोर येते. हे सायको थ्रिलर कथानक असल्याने याबाबत अधिक
भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
वैशिष्ट्ये : हा चित्रपट पूर्णपणे राधिका आपटे हिच्या भोवतीच फिरत राहतो. त्यामुळे तीच या चित्रपटाचे केंद्र आहे. ती या चित्रपटाची हीरोइन नव्हे, तर हीरो आहे. महकचे पात्र राधिकाने इतके बारकाईने सादर केले आहे की, प्रेक्षक तिच्या अभिनयात अक्षरश: गुंग होऊन जातात. राधिका आपटेने हे सिद्ध केले आहे की, ती या काळातल्या उत्कृष्ट नायिकांपैकी एक आहे.
दिग्दर्शक पवन कृपलानी यासाठी प्रशंसेस पात्र आहेत. कारण त्यांनी कथानकावर लक्ष केंद्रित केले आहे आणि कथानकाला कुठे भरकटू दिले नाही. सुरुवातीच्या दहा मिनिटांतच चित्रपट प्रेक्षकांना आपलेसे करून घेतो, तर पुढे काय होईल या उत्सुकतेपोटी प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो.
गती आणि चांगले कथानक यांनी चित्रपटाला आणखी उंचीवर नेऊन ठेवले आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये उत्सुकता वाढवीत राहतात. चित्रपटाचे संकलन आणि पार्श्वसंगीतही दमदार आहे. राधिका आपटेशिवाय तिचा मित्र शान याच्या भूमिकेत सत्यदीप मिश्रा, शेजारची मुलगी निक्की हिच्या भूमिकेतील यशस्विनी आणि शेजारी मनूच्या भूमिकेतील अंकुर विकाल याचा अभिनयही चांगला आहे.
उणिवा : सायको थ्रिलरसारख्या चित्रपटात गती असेल, तर उणिवा झाकल्या जातात. चित्रपटात नाच-गाण्याचा मसाला नाही. ग्लॅमर आहे, पण रोमान्स नाही. क्राइम आहे, पण पोलीस नाहीत. जर याला उणिवा म्हणता येत असेल तर त्या यात आहेत.
का पाहावा?
राधिका आपटेच्या उत्कृष्ट अभिनयासाठी.
का पाहू नये?
थ्रिलर चित्रपट न आवडणाऱ्यांना कदाचित हा चित्रपट खूश करणार नाही.
एकूणच काय तर फोबियात ते सर्व काही आहे जे की, एखाद्या थ्रिलर चित्रपटात असायला हवे. असे चित्रपट प्रेक्षक एकदाच बघतात. चित्रपट पाहणाऱ्यांकडून अशी अपेक्षा केली जाते की, कथानकाबाबत कुणाशी जास्त व्यक्त होणे टाळावे.