'फोटोकॉपी' - दुहेरी लपंडावाची नवी गोष्ट!

By Admin | Published: September 17, 2016 01:43 AM2016-09-17T01:43:23+5:302016-09-17T01:43:23+5:30

प्रेमाचा त्रिकोण किंवा जुळी भावंडे अशा विषयांनी हिंदी चित्रपटांचा एक काळ प्रचंड गाजवला आणि प्रेक्षकांना पडद्यावर असा प्लॉट पाहण्याची सवय लावली

'Photocopy' - A new twist! | 'फोटोकॉपी' - दुहेरी लपंडावाची नवी गोष्ट!

'फोटोकॉपी' - दुहेरी लपंडावाची नवी गोष्ट!

googlenewsNext

मराठी चित्रपट - राज चिंचणकर
प्रेमाचा त्रिकोण किंवा जुळी भावंडे अशा विषयांनी हिंदी चित्रपटांचा एक काळ प्रचंड गाजवला आणि प्रेक्षकांना पडद्यावर असा प्लॉट पाहण्याची सवय लावली. थोड्याबहुत फरकाने याचेच प्रतिबिंब ‘फोटोकॉपी’ या मराठी चित्रपटात पडलेले दिसते. चित्रपटाच्या बोलक्या शीर्षकातून ध्वनित होत असलेल्या जुळेपणाचा अंदाजही हा चित्रपट अजिबात चुकवत नाही. पण यातला प्रेमत्रिकोण मात्र अंगवळणी पडलेल्या सवयीच्या पलीकडचा आहे आणि हे या गोष्टीचे वेगळेपण आहे. या सगळ्यातून दुहेरी लपंडावाची ही गोष्ट नव्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.
मधू आणि माला या दोन जुळ्या बहिणींची ही कथा आहे. साधारणत: जुळ्या भावंडांच्या स्वभावात बरेचसे साम्य आढळते; परंतु या चित्रपटातल्या बहिणींचे स्वभाव आणि वागणूक विरुद्ध टोकांची आहे. मधू ही टॉमबॉईश प्रकारात मोडणारी, आगाऊपणा करणारी; तर माला ही नाकासमोर चालणारी, देवभोळी वगैरे आहे. दोघीही कॉलेज लाइफ एन्जॉय करत आहेत आणि अशातच त्यांच्या आयुष्यात समीर हा तरुण येऊन टपकतो. इथे या गोष्टीला वळण मिळते आणि पुढे लपाछपीची वाट चालत हा चित्रपटही निश्चित अशा वळणावर येऊन ठेपतो.
जुळ्या बहिणी हा चित्रपटाचा प्लॉट मुळात धमाल आणणारा आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती, प्रेमकहाणी, असूया, भावनांचे हिंदोळे असा पट दिग्दर्शक विजय मौर्य यांनी मांडला आहे. ओमकार मंगेश दत्त आणि आकाश राजपाल यांच्या कथेवर योगेश जोशी आणि विजय मौर्य यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. या गोष्टीचा पाया पक्का आहे; परंतु काही ठिकाणी त्याची पडझड झाल्याचे जाणवते. समीर व मालामध्ये काही तरी खास घडू पाहत असताना, मधूचाही अचानक त्यात जीव अडकणे हे पचनी पडणे कठीण जाते.
तसेच मधू व मालामध्ये पराकोटीचा ताण असण्याचे कारणही स्पष्ट होत नाही. जुळी बहीण असूनही असूयेचा आलेख इतका टोकदार का असावा, असाही प्रश्न पडतो. तसेच तब्बल २५ दिवस एखादी व्यक्ती घरातून गायब असावी आणि ते लपून राहावे हेही सहज पटत नाही. पण अशाही स्थितीत दिग्दर्शक विजय मौर्य यांनी हा पट रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी चित्रपटाचा लूक अगदी फ्रेश ठेवला आहे.
चित्रपट आजच्या तरुणाईची भाषा बोलतो आणि त्यामुळे तो ताजा वाटतो. चित्रपटातली संगीताची बाजू चांगली आहे आणि यातली गाणी मनात रेंगाळतात. चित्रपटाचे कॅमेरावर्क आणि संकलन कथेला साजेसे आहे.
यात जुळ्या बहिणींची भूमिका तन्मयतेने रंगवण्याचे आव्हान पर्ण पेठे हिने ताकदीने पेलले आहे. दोन विरुद्ध टोकाच्या संवेदना मनात उतरवण्यात ती यशस्वी ठरली आहे. फक्त तिच्यातला लाऊडपणा थोडा कमी व्हायला हवा होता.
चित्रपटाचा संपूर्ण फोकस तिच्यावर असल्याने तिची जबाबदारी मोठी होती आणि त्यात मात्र ती कमी पडलेली नाही. समीरच्या भूमिकेत चेतन चिटणीस हा नवा चेहरा दखल घ्यायला लावत असला तरी त्याला बरीच मजल मारायची असल्याचे स्पष्ट होते.
छोट्या छोट्या प्रसंगांत अंशुमन जोशी छाप पाडतो. तरुणाईच्या या विश्वात वंदना
गुप्ते आणि गिरीश ओक हे अनुभवी कलावंत त्यांचे
वेगळेपण अधोरेखित करतात.
नेहा राजपाल आणि आकाश राजपाल यांचे मराठी चित्रपट निर्मितीतले हे पहिले पाऊल आश्वासक असून, त्यांच्याकडून यापुढे अधिक चांगल्या कलाकृतींची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Web Title: 'Photocopy' - A new twist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.