अधुरी एक कहाणी !... म्हणून लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:19 PM2023-02-06T13:19:38+5:302023-02-06T13:26:17+5:30

Lata Mangeshkar : भारताच्या गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले.

भारताच्या गानकोकिळा दिवंगत लता मंगेशकर यांचा आज ६ फेब्रुवारी रोजी पहिला स्मृतिदिन आहे. आज लता दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या सदाबहार गाण्यांची जादू प्रेक्षकांवर कायम असणारच आहे.

लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सर्वांनाच माहित आहेत. मात्र त्यांच्या प्रेम कहाणीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. पहिले प्रेम काही केल्या विसरता येत नाही, असे म्हणतात आणि याच कारणामुळे लता मंगेशकर यांनी लग्न केले नव्हते, असे सांगितले जात आहे.

लता मंगेशकर या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात होत्या. त्यांनी प्रेमाची देखील कबूल दिली होती. मात्र त्यांचे प्रेम त्यांना मिळू शकले नाही. लता मंगेशकर यांचं डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रेम होते, असे म्हणतात.

लता मंगेशकर यांचं डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रचंड प्रेम होते. हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह एकमेकांचे चांगले मित्र होते. ते एकत्र क्रिकेट खेळायचे.

जेव्हा राजा सिंह कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले होते, तेव्हा त्यांची ओळख झाली. यादरम्यान, त्यांचे घरी येणे-जाणेदेखील वाढले होते.

लता दीदी आणि राज सिंह यांच्यातही मैत्री वाढली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तोपर्यंत लता दीदींच्या नावाचाही मोठ्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश झाला होता. मीडियामध्येही लता आणि राज यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. या दोघांनाही लग्न करायचं होते, मात्र ही गोष्ट सत्यात उतरू शकली नाही.

असे म्हटले जाते की, सर्वसामान्य घराण्यातील मुलीशी लग्न करणार नाही, असे वचन राज यांनी आपल्या आई-वडिलांना दिले होते. आयुष्याच्या शेवटापर्यंत राज यांनी हे वचन पाळलं आणि लता यांच्याप्रमाणेच ते आयुष्यभर अविवाहित राहिले.

राज आणि लता दीदी यांच्यामध्ये ६ वर्षांचं अंतर होते. राज यांनी क्रिकेट खेळाची प्रचंड आवड होती. क्रिकेट प्रेमामुळे ते कित्येक वर्षे बीसीसीआयशी जोडले गेले होते.

लता दीदींचं क्रिकेट प्रेम तर सर्वांनाच माहिती आहे. राज आणि लता यांना एकत्र आणण्यात क्रिकेटचंही मोठं योगदान होते. राज लता दीदींना प्रेमानं मिठ्ठू नावानं हाक मारायचे.

त्यांच्या खिशामध्ये एक टेप रेकॉर्डर नियमित असायचा, यामध्ये लता दीदींच्या निवडक गाण्यांचा समावेश होता.

जसा वेळ मिळायचा तसे ते लता यांनी गायलेली गाणी ऐकायचे. दरम्यान,१२ सप्टेंबर २००९ रोजी राज सिंह यांचे निधन झाले. दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते, मात्र ही कहाणी अधुरीच राहिली.