IN PICS : शाहरूख व काजोल दोघांनाही DDLJ करायचा नव्हता, मग कसं जुळून आलं पुढचं सगळं? By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:46 PM 2023-02-14T15:46:13+5:30 2023-02-14T15:58:26+5:30
Dilwale Dulhania Le Jayenge : ऐकून आश्चर्य वाटेल पण शाहरूख खान व काजोल दोघंही 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा करायला तयार नव्हते. 'द रोमांटिक्स' या सीरिजच्या निमित्ताने खुद्द आदित्य चोप्राने हा खुलासा केला. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' अर्थात 'डीडीएलजे' या चित्रपटाचं गारुड आज इतक्या वर्षांनंतरही सिनेप्रेमींच्या मनावर कायम आहे. राज आणि सिमरनच्या या प्रेमकहाणीनं नव्वदच्या दशकात सगळ्यांनाच वेड लावलं होतं.
या सिनेमानं तरुणाईला प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. सगळ्यांना युरोपची सैर घडवली. 'बडे बडे देशो मे...', 'पलट.. पलट... पलट...', 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी', हे सिनेमातले संवादही अजरामर होऊन गेलेत.
या सिनेमाचा एकूण प्रवासच अद्भूत होता. दिग्दर्शक आदित्य चोप्रा पहिल्यांदा या सिनेमावर बोलला. 'द रोमांटिक्स' या नेटफ्लिक्सवरच्या सीरिजच्या निमित्ताने त्याने डीडीएलजेचे पडद्यामागचे अनेक किस्से सांगितले.
ऐकून आश्चर्य वाटेल पण शाहरूख खान व काजोल दोघंही आधी हा सिनेमा करायला तयार नव्हते. 'द रोमांटिक्स' या सीरिजच्या निमित्ताने खुद्द आदित्य चोप्राने हा खुलासा केला.
होय,शाहरूखला आदित्यसोबत एक ॲक्शन सिनेमा करायचा होता. पण आदित्यने शाहरूखला डीडीएलजे या राेमॅन्टिक सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली. आदित्या चांगला मित्र होता, त्यामुळे शाहरूख त्याला थेट नकार देऊ शकत नव्हता.
आदित्यनेही पिच्छा सोडला नाही. तो रोज शाहरूखच्या सेटवर जायचा आणि एसआरकेला भेटायचा. मग काय शाहरूख दरवेळी आदित्यला काहीतरी कारण सांगून टाळायचा.
अशात एकदिवस एका सेटवर एका वयोवृद्ध चाहतीने शाहरूखला असा काही प्रश्न केला की, शाहरूख डीडीएलजे करायला तयार झाला. तू एखादा रोमॅन्टिक सिनेमा का करत नाहीस, असं ती महिला शाहरूखला म्हणाली आणि शाहरूखने लगेच आदित्य चोप्राला होकार कळवला.
दुसरीकडे काजोलने सिनेमाची स्क्रिप्ट ऐकताच नकार दिला होता. मी या भूमिकेत फिट बसणार नाही. कारण मी रिअल लाईफमध्ये सिमरनच्या अगदी विरूद्ध आहे, असं तिचं मत होतं. त्यामुळे ती साशंक होती. पण शाहरूख चांगला मित्र होता. त्याच्याखातर काजोल या सिनेमासाठी राजी झाली.
काजोल राजी झाली होती. शाहरूखने आधीच होकार कळवला होता. पण ॲक्शन हिरो बनण्याचं भूत त्याच्या इतकं मानगुटीवर बसलं होतं की, त्याने आदित्य व यश चोप्रांना या सिनेमात बळजबरीने ॲक्शन सीक्वेन्स टाकायला लावला.
त्याचं झालं असं की, अनुपम खेर सेटवर पोहचायला तासभर उशीर होणार होता. या तासाभरात काय करायचं, तर शाहरूख ॲक्शन सीन करण्याचा हट्ट धरून बसला. अखेर टीमने मन मारून हा ॲक्शन सीन शूट केला. त्यामुळे डीडीएलजेच्या क्लायमॅक्समधील ॲक्शन सीनचं संपूर्ण श्रेय शाहरूखचं आहे.
आदित्य चोप्रा डीडीएलजेच्या स्क्रिप्टच्या इतका प्रेमात होता की, रोज दोनदा तो चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायचा. पोराचं हे वेड बघून यश चोप्रांनाही चिंता सतावू लागली होती. सिनेमा आपटला तर आदित्य कोलमडून जाईल, ही भीती त्यांना वाटू लागली होती.