Amitabh Bachchan Birthday : 'लोक म्हणाले मी जयाला सोडून रेखासोबत राहतो', पहिल्यांदाच रेखाबाबत बोलले होते अमिताभ By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:13 PM 2021-10-11T13:13:51+5:30 2021-10-11T13:30:45+5:30
Amitabh Bachchan Birthday : अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसआधी अभिनेत्री रेखाचा वाढदिवस असतो. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबाबत अनेक चर्चा होतात. त्यांच्या प्रेमातचे अनेक किस्सेही ऐकायला मिळतात. आज म्हणजेच ११ ऑक्टोबरला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. अमिताभ यांनी त्याचा वाढदिवस सोशल मीडियावर साजरा केला. त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांचा एक फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांनी त्यांचं वयही शेअर केलं. अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या एक दिवसआधी अभिनेत्री रेखाचा वाढदिवस असतो. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबाबत अनेक चर्चा होतात. त्यांच्या प्रेमातचे अनेक किस्सेही ऐकायला मिळतात.
असं बोललं जातं की, रेखासोबत अमिताभ यांचं लिंकअप जया यांच्यासोबतच्या लग्नानंतर झालं होतं. १९७३ मध्ये जया यांच्यासोबत लग्न केल्यावर काही वर्षातच रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दोघांनी 'दो अनजाने' 'मिस्टर नटवरलाल', 'सिलसिला', 'दो अनजाने', 'नमक हराम', 'मुकद्दर का सिकंदर' सारख्या सिनेमात काम केलं होतं. पण दोघांनी कधीही त्यांच्या अफेअरचं मान्य केलं नाही.
फार कमी वेळा रेखा आणि अमिताभ एकमेकांबाबत बोलताना दिसले. रेखा सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि अमिताभच्या नात्याबाबत बोलली तर अमिताभ यांनीही १९९८ मध्ये अशीच एक मुलाखत दिली होती अमिताभ यांची ही मुलाखत फार खास मानली जाते. यात अमिताभ रेखा आणि त्यांच्या नात्याबाबत बोलले होते. याच मुलाखतीतील काही प्रश्न-उत्तरे बघुया...
सिमी - एक बाब दर दुसऱ्या वर्षी समोर येते ती म्हणजे तुमच्या आणि रेखाच्या अफेअरची, असं का होतं आणि लोक का अशा गोष्टींची चर्चा करतात?
अमिताभ - हे त्या लोकांना जाऊन विचारा, ते हे मुद्दाम करतात.
सिमी- कोण अशा गोष्टी समोर आणतात? अमिताभ- मीडिया
सिमी - तुम्हाला असं वाटतं का की, ही केवळ मीडियाची देन आहे?
अमिताभ - जर यामागे दुसरं कुणी असेल तर मला त्याबाबत माहीत असायला हवं.
सिमी - तुम्ही दोघे कधी एकमेकांशी भेटले?
अमिताभ - ती माझी सहकलाकार होती, माझी को-स्टार होती आणि जेव्हा आम्ही सोबत काम करतो तेव्हा अर्थातच आम्ही भेटलो. सामाजिकपणे पाहिलं तर आम्हा दोघांमध्ये काहीच एकसारखं नाही. बस इतकंच आहे.
सिमी - तुम्ही दोघे एकमेकांना कधीपासून भेटले नाहीत?
अमिताभ - बरीच वर्ष झालीत. म्हणजे असं सांगायचंय की, कधी कधी एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या इव्हेंटमध्ये भेट व्हायची. बस इतकंच.
सिमी - तुम्हाला या अफवांचा त्रास होतो?
अमिताभ - नाही. मी या आरोपांचा खूप सामना केलाय. पण खरं सांगायचं तर अलिकडे आलेले काही आरोप फारच वाईट होते. काहींनी दावा केला होता की, मी तिच्यासोबत राहत आहे किंवा ती माझ्या घरी राहण्यासाठी आली आहे. आणि काही लोकांनी दावा केला की, त्यांच्याकडे त्या घरांचे फोटोही होते ज्या घरात मी रेखाला ठेवलं होतं.
अमिताभ पुढे म्हणाले होते की, तर मग अशा गोष्टींबाबत काय बोलायचं ज्या केवळ गंमत आहेत त्यापेक्षा जास्त काही नाहीत. ते घर माझं आहे, माझा परिवार तिथे राहतो, माझे आजारी आई-वडील तिथे राहतात आणि मी त्यांची काळजी घेतो. ही फारच संवेदनशील बाब आहे की, कोणताही पुरावा नसताना आणि कोणतीही चौकशी न करता माझ्यावर अशाप्रकारचे आरोप लावायचे. मला त्या लोकांना विचारायचं आहे की, त्यांनी मला त्या महिलेसोबत काहीतरी चुकीचं करताना किंवा काही अनैतिक करताना खरंच पाहिलंय का? मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही आम्हा दोघांना एकत्र कधी पाहिलं होतं की, तुम्हाला अशाप्रकारच्या गोष्टी बोलण्याचा इशारा मिळाला.