गुरु नीम करोली बाबा यांना अनुष्का शर्माने वाहिली श्रद्धांजली, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुम्हाला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:58 AM2023-03-08T10:58:12+5:302023-03-08T11:09:04+5:30

गुरु नीम करोली बाबांना श्रद्धांजली अर्पण करत अनुष्का शर्माने खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पती क्रिकेटर विराट कोहली सध्या त्यांच्या धार्मिक दौऱ्यांमुळे चर्चत आहेत. नुकतेच त्यांनी उज्जैनच्या ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

खूप कमी जणांना माहित असेल की अनुष्काचा आध्यात्मावर प्रचंड विश्वास आहे. नीम करोली बाबा यांना ती गुरु मानते. काही महिन्यांपूर्वी अनुष्काने विराट कोहलीसोबत नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट दिली होती.

आता अनुष्काने नुकतेच काही फोटो शेअर करत गुरुंना श्रद्धांजली अर्पण केली. तिने नीम करोली बाबा यांचा फोटो देखील पोस्ट केला आहे.' नामस्मरणाने मनातल्या प्रेमाची जाणीव होते आणि माझ्यासाठी ते माझे गुरु नीम करोली बाबा आहेत. हा कोणताच ग्रुप नाही ज्यात मी तुम्हाला सामील व्हायला सांगत आहे. आपण तो आधीच जॉईन केला आहे ज्याचे नाव ह्युमन रेस असे आहे.' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

अनुष्काने गायक कृष्णा दास यांच्यासोबतचाही एक फोटो पोस्ट केला आहे. कृष्णा दास हे अमेरिकेचे आहेत मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कीर्तन करतात. त्यांचे अनेक अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत.

नीम करोली बाबा यांची ख्याती प्रचंड आहे. त्यांच्या आश्रमात गेल्यावर कोणीच रिकाम्या हाती परतत नाही असं म्हणतात. विराट कोहलीचा क्रिकेटमधील खराब फॉर्म सुरु असतानाच तो त्याने पत्नी अनुष्कासोबत नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट दिली आणि त्याच्या खेळात सुधारणा झाली.

नीम करोली बाबा यांना गुरु मानणारे केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत.अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी देखील नीम करोली बाबांच्या आश्रमाला भेट दिली आहे.

अनुष्का शर्माच्या धार्मिक दौऱ्याची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. आधी नैनीताल, मग वृंदावन येथील आश्रमांना भेट दिल्यानंतर दोघेही फार चर्चेत आले होते.

याशिवाय अनुष्काने तिच्या मध्य प्रदेश येथील जुन्या आठवणी जाग्या केल्या.ती लहानपणी राहत होती ते घर, ती शाळा, आर्मी एरिया अशआ सर्व ठिकाणी ती पुन्हा गेली आणि तिथल्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या.