कष्टाचं फळ! फुटपाथवर झोपला, सिक्योरिटी गार्डचं काम केलं; आता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:10 PM2023-11-02T15:10:12+5:302023-11-02T15:15:41+5:30

टीव्ही आणि चित्रपटांसह वेब सीरिजमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने दिल्लीमध्ये गार्ड म्हणून काम केलं आहे.

ज्यांच्याकडे काहीतरी मिळवण्याची जिद्द असते त्याला नक्की यश मिळतं असं म्हणतात. हजारो लोक अभिनेते-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन चित्रपट जगतात येतात. काही लोकांची स्वप्ने यशस्वी होतात तर काहींची निराशा होते. पण काही असे असतात जे हार मानत नाहीत आणि जे करायचं आहे ते साध्य करतात.

असाच एक अभिनेता आहे, ज्याचा संघर्षमयी प्रवास ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. टीव्ही आणि चित्रपटांसह वेब सीरिजमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने दिल्लीमध्ये गार्ड म्हणून काम केलं आहे. तसेच तो फूटपाथवर झोपायचा आणि त्यासाठी त्याला 25 रुपये मोजावे लागायचे.

रोज काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणाला चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमवायचं होते. या अभिनेत्याने त्याला हवं ते करून दाखवलं. आज जवळपास 40 कोटींचा मालक असलेला हा अभिनेता कोण हे जाणून घेऊया...

काई पो चे! ज्या चित्रपटाने इंडस्ट्रीला नवे स्टार दिले. सुशांत सिंह राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध. लोकांना या तिन्ही कलाकारांचा अभिनय इतका आवडला की त्यांनी त्यांना रातोरात स्टार बनवलं. या तिन्ही अभिनेत्यांबद्दल तुम्हाला बरेच काही माहित असेल.

अमित साधने सांगितलं की, मी दिल्लीतील बेनेटन शोरूममध्ये सिक्योरिटी गार्ड होतो. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहतो तेव्हा मी कोठून आलो याची आठवण करून देतो. जेव्हा लोक मला विचारतात की मी सर्वांशी दयाळू का आहे? मी त्यांना सांगतो की माझ्यासाठी प्रत्येकजण जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे.

सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करतानाच्या आठवणी सांगताना तो म्हणाला, जेव्हा मी फुटपाथवर राहायचो तेव्हा देखील माझी आवड चांगलीच होती. त्यावेळी 25 रुपये प्रति रात्र जोरबाग कम्युनिटी सेंटरमध्ये झोपायला मिळायचं. मी फुटपाथवर असतानाही मी दिल्लीच्या सर्वात महागड्या भागात राहत होतो.

अमित साध पुढे म्हणाला, या अनुभवांनी त्याला करुणा आणि सहानुभूती शिकवली आहे. म्हणूनच मला स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही. ज्या दिवशी तुम्हाला सहानुभूती समजेल, तेव्हा तुमचे जीवन बदलेल. तुम्ही कुठून आलात हे कधीही विसरू नका.

मुंबईत अभिनेता म्हणून सुरुवात केल्यानंतर अमितने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि 2014 मध्ये 'काई पो चे' चित्रपटात ब्रेक मिळाला. त्यानंतर, त्याला सलमान खानच्या ब्लॉकबस्टर सुलतानमध्ये सहाय्यक भूमिका मिळाली आणि तेव्हापासून तो ओटीटीमध्ये प्रदर्शित झालेल्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसत आहे.

अमितने खूप मेहनत करून हे स्थान मिळवले आहे. एकेकाळी गार्ड म्हणून काम करणारा अमित आज कोट्यवधींचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आज तो 40 कोटींहून अधिकचा मालक आहे.